मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कामाला गती द्या- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कामाला गती द्या- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई / चंद्रपूर, दि. ८ : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल  ज्ञान मिळावे, या दृष्टीने मूल येथे प्रस्तावित असलेले कृषी महाविद्यालय पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने काम करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

कृषी महाविद्यालयाचे इमारत बांधकाम व इतर प्रलंबित विषयांचा आढावा मंत्रालयात  मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी घेतला.  यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलसचिव सुधीर राठोड, कृषी विभाग आणि इतर विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कृषी महाविद्यालयाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय इमारत आणि मुला आणि मुलींच्या वसतिगृहाच्या कामांचा समावेश आहे. या कृषी महाविद्यालयासाठी लागणारी सध्याची जमीन ही वन विभागाची आहे. या जमिनीची  हस्तांतरण प्रक्रिया तातडीने व्हावी, याबाबतीत कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेती हा आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा कणा आहे. देशासह राज्यातील जनता शेती व्‍यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्‍पन्न दुप्‍पट करण्‍याचे शासनाचे ध्‍येय आहे. या ध्‍येयपूर्तीसाठी  महत्‍त्‍वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे; यामध्ये प्रशासकीय अडचणी येता कामा नयेत, असेही ते म्हणाले. स्थानिक तरुणांचा शेतीकडे कल वाढावा व त्याला योग्य कृषीविषयक शिक्षण मिळावे म्हणूनच डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून चंद्रपूर-गडचिरोली मधील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी हे कृषी महाविद्यालय उभे करण्याचा संकल्प केला आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

महाविद्यालयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासंदर्भात सुधारित प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले.

 

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here