कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सजग राहण्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचे आवाहन

कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सजग राहण्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचे आवाहन

औरंगाबाद, दि. 23 (जिमाका)- मराठवाडा विभागात आतापर्यंत पर्जन्यमान कमी झाले आहे. आतापर्यंतच्या पावसाळ्यात 50 दिवस कोरडे राहिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व जिल्हा प्रशासनांनी सजग राहावयाचे आहे. पावसाने अधिक ओढ दिल्यास पर्यायी उपाययोजनांसाठी नियोजन, पिक नुकसानीचे पंचनामे, लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कामे करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी आज दिले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सोहळा, संभाव्य नियोजित मंत्रिमंडळ बैठक, तसेच कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होत असलेली स्थिती याबाबत विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा आज घेण्यात आला.

या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपायुक्त (विकास) सुरेश बेदमुथा, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी सहभागी झाले होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सांगता सोहळा विभागात होत आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने नियोजन करुन समाजाभिमुख तसेच लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे. जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करुन पुढील पिढीपर्यंत मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास पोहोचवावा, असे निर्देश श्री. आर्दड यांनी दिले.

येत्या दि.16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याचे संभाव्य नियोजन आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या जिल्ह्यातील निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे प्रस्ताव तयार करावे. लागणाऱ्या निधीबाबत माहिती द्यावी. जिल्ह्याचा आणि विभागाचा विकास होण्याच्या दृष्टिने हे प्रस्ताव तयार करुन सादर करावे, असे निर्देश देण्यात आले.

विभागात पर्जन्यमानाची स्थिती ही समाधानकारक नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर होणारे परिणाम तपासावे. त्यासाठी मंडळनिहाय तपासण्या कराव्या. संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर विभागात जलजीवन मिशनच्या कामांना गति द्यावी. यासंदर्भात जिल्हा परिषदस्तरावर दर 15 दिवसांनी तर जिल्हाधिकारीस्तरावर दरमहा आढावा घेण्यात यावा. तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेचे नियोजन करुन ठेवावे. विभागीय आयुक्त श्री. आर्दड म्हणाले की, लम्पी चर्म रोगाची गायवर्गीय जनावरांना लागण झाल्याचे दिसून येत आहे. प्रतिबंधात्मक लसी विभागात पुरेशा उपलब्ध आहेत. त्यामुळे जनावरांचे लसीकरण करुन घेण्यास प्राधान्य द्यावे. ज्यांची जनावरे दगावली आहेत अशा पशुपालकांना द्यावयाच्या मदतीबाबत तात्काळ प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here