एक-दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर पाऊस दाखल झाल्याने पिकांना जीवदान मिळणार नसले तरी जनावरांसाठी हिरवा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. बुधवारी रात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत चांदवड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने चंद्रेश्वर गड, रेणुकादेवी मंदिर परिसर व इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरातील धबधबे सुरू झाल्याने पर्यावरण प्रेमींनी याचा आनंद लुटला. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.
निफाड तालुक्यातही बुधवारी मध्यरात्री १२ वाजेपासून श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला. दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर गुरुवारी दुपारनंतरही निफाड, चांदोरी, विंचूर, कुंदेवाडी, पिंपळस आदी भागात संततधार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले. मात्र, नद्या, नाले, ओढे भरून वाहण्यासाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसभर वातावरण ढगाळ होते.
खान्देशातही दमदार पाऊस
महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी रात्रीपासूनच खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तिनही जिल्ह्यात हजेरी लावली. खान्देशातील अनेक भागात कमी जास्त प्रमाणात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा उत्साह असला तरी कोमेजणाऱ्या पिकांना तारण्यासाठी आणखी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बुधवारी जळगाव जिल्ह्यात एकूण १२ मिमी पावसाची नोंद झाली.