रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत पुन्हा सुरू करावी – मंत्री दीपक केसरकर यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत पुन्हा सुरू करावी – मंत्री दीपक केसरकर यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

मुंबई, दि. ६ : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची रामटेक या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी श्री. केसरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट दरात असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी. तसेच महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्सप्रेसचे जुने डबे बदलून मिळावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री श्री.दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यांना रेल्वे प्रवासात यापूर्वी लागू असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याकडे केली आहे. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच त्यांना सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे तिरूपती तसेच मुंबई येथून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. यासाठी उपलब्ध असलेल्या हरिप्रिया तसेच महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे जुने आणि गैरसोयीचे झाले असल्याने ते बदलून मिळण्याबाबत भाविक आणि प्रवाशांकडून विनंती करण्यात येत आहे. हे डबे बदलून नवीन डबे मिळाल्यास प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखद होऊ शकणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी  केंद्रीय राज्यमंत्री श्री.दानवे यांना सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here