सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीचा उदय

सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीचा उदय

संपूर्ण महाराष्ट्रात ब्रिटिश अंमल होता, मात्र मराठी भाषिक प्रदेश असलेल्या मराठवाड्यात निजामशाही होती. शिक्षणाची गैरसोय होती, काही शाळा होत्या पण त्यांची भाषा उर्दू होती. १९१७ साली हैद्राबादमध्ये उस्मानिया विद्यापीठ व १९२७ मध्ये औरंगाबादला इंटरमिजिएट कॉलेज स्थापन झाले.

आजुबाजूच्या  विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र , दक्षिण महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता होती, ब्रिटिश आधुनिक शिक्षणाच्या बाबतीत आग्रही होते. त्यामुळे तिथल्या जनतेचे शिक्षण होत होते. मात्र मराठवाड्यात आधुनिक शिक्षण शिकण्याला मर्यादा येत होत्या त्याच बरोबर निजाम संस्थानमध्ये मराठवाड्यातील लोकजीवनावर चौफेर सांस्कृतिक आक्रमण चालू होते.

सांस्कृतिक चळवळीचा उदय

स्वातंत्र्याच्या चळवळी इतर भागात आकार घेत होत्या. त्यामुळे मराठवाड्यातही सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून लोकजागृती मूळ धरत होती. लातूरमध्ये पुण्यावरून येऊन लोकमान्य टिळकांनी इ.स. १८९१ मध्ये पहिली जिनिंग प्रेस काढली. त्यातून राजकीय जागृतीचं पाऊल मराठवाड्यात पडलं.. या निमित्ताने लोकमान्य टिळक यांनी हिंगोली, परभणीस भेट दिली होती.

१९०१ मध्ये परभणीत सुरु झालेले गणेश वाचनालय मराठवाड्यातील पहिले वाचनालय होते. त्यानंतर हिंगोली, कळमनुरी, औंढा, औसा, सेलू, मानवत, नळदुर्ग, तुळजापूर, चाकूर, लोहारा येथेही वाचनालये सुरु झाली. १ ऑगस्ट १९२० रोजी औरंगाबाद येथे बलवंत वाचनालय स्थापन झाले. आ. कृ. वाघमारे हे या वाचनालयाचे प्रवर्तक होते.

खाजगी शाळा या राष्ट्रीय भूमिकेतून कार्य करु लागल्या. सरकारचे धोरण खासगी शाळांबाबत फारसे अनुकूल नव्हते तरीही इ.स. १९३५ च्या सुमारास २० खासगी शाळा राष्ट्रीय भावनेतून सुरु झाल्या. त्यात परभणीचे नूतन विद्यालय, औरंगाबादचे सरस्वती भुवन विद्यालय, शारदा मंदिर हिप्परगा येथील राष्ट्रीय विद्यालय, श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी, योगेश्वरी विद्यालय अंबाजोगाई, श्यामलाल विद्यालय उदगीर, ज्युबिली विद्यालय लातूर, नुतन विद्यालय सेलू, राजस्थान विद्यालय लातूर, भारत विद्यालय उमरगा, चंपावती विद्यालय बीड, नुतन विद्यालय उमरी, प्रतिभा निकेतन नांदेड, मराठा हायस्कूल औरंगाबाद असा क्रम लागतो. यामागे स्वामी रामानंद तीर्थ व बाबासाहेब परांजपे यांची प्रेरणा होती. वरील शिक्षण संस्थांनी मराठवाड्यात राष्ट्रीय जागृतीचे कार्य केले. शारदा मंदिर शाळेमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली. तर मराठा शिक्षण संस्थेने बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.

क्रमशः….

  • जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here