दीक्षाभूमी व चैत्यभूमीप्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व – मंत्री छगन भुजबळ

दीक्षाभूमी व चैत्यभूमीप्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व – मंत्री छगन भुजबळ

मुक्तिभूमी येथे ८८ व्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न 

नाशिक, दिनांक: 13 (जिमाका वृत्तसेवा): महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते. नागपूर येथील दीक्षाभूमी व दादारची चैत्यभूमी प्रमाणेच येवल्याच्या मुक्तिभूमीला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज येवला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी येथे ८८ व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, मुक्तिभूमी स्मारक समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व अनुयायी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, दरवर्षी १३ ऑक्टोबर, विजयादशमी व १४ एप्रिल या दिवशी देशभरातून लाखो बौद्धबांधव मुक्तिभूमीवर डॉ.बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. तसेच वर्षभर हजारो पर्यटक आणि बौद्धबांधव येथे भेटी देत असतात. मुक्तिभूमी स्थळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्त्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे परिषद भरली. भारताच्या कानाकोपऱ्यातून १० हजार अनुयायी येथे जमले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञापूर्ती केली होती. त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया असल्याचे म्हटले जाते. असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येणार आहे. या बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवासाठी देश विदेशातून उपासक येणार असल्याने या कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहण्याचे आवहन मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांना केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी पुढे न्यावेत : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

येवला शहर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून येथे त्यांनी ८८ वर्षांपूर्वी  धर्मांतराची घोषणा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान हे सर्व जाती, धर्माला न्याय देणारे संविधान आहे. संविधानातून अखंड भारताची रचलेली लोकशाही जगभरात कौतुकास पात्र आहे. १२ वर्षानंतर या मुक्तिभूमीस १०० वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने जागतिक स्तरावर या स्थानाला महत्त्व प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी पुढे न्यावेत अशी अपेक्षा यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुक्तिभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना केली.

येवला मुक्तिभूमी विकास कामे

मुक्ती भूमीचे महत्त्व लक्षात घेवून सदर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभुषण स्तुपाचे १५ कोटी किंमतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. फेज १ अंतर्गत येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक मुक्तिभूमी चा विकास करून याठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण स्तूप व विपश्यना हॉल निर्माण करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येवला मुक्तिभूमी या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. येवला मुक्तिभूमी स्मारक परिसरात फेज दोन अंतर्गत पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, ॲम्पीथिएटर, मिटिंग हॉल, भिक्कू पाठशाला, १२ भिक्कू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, लॅण्डस्केपिंग, आदी विकास कामे पूर्ण झाली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here