बहुगुणी राजगिरा

बहुगुणी राजगिरा

भारतीयांसाठी श्रावण महिना विशेष असतो. श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्ये, व्रत, उपवास केले जातात. उपवासासाठी राजगिरा अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राजगिरा महत्त्वाचा आहे. राजगिरा हे आहार शास्त्रानुसार सुपर फूड मानले जाते.

राजगिरा पिकाचे महत्त्व

राजगिरा ही अत्यंत बहुपयोगी व पौष्टिक वनस्पती असून जागतिक पातळीवर या पिकास उत्कृष्ट अन्न म्हणून घोषित केलेले आहे.शरीरासाठी अत्यंत गुणकारी असल्याने ‘सुपर फुड’ म्हणून प्रचलित आहे.

राजगिरा ग्लुटेन फ्री, फायबरने युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करण्यास उपयुक्त, हाडाच्या मजबुतीसाठी वापर, विटँमिन सी भरपूर मात्रेत असल्याने त्वचा, केस व हिरड्यांच्या  विकारांवर उपयुक्त आहे. स्तनदा  मातांसाठी दुग्धवाढी करिता उपयुक्त ठरतो. राजगिऱ्यामधील  रक्तस्तंभक गुणधर्म   रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करतो. या धान्यामध्ये 14 ते 16 टक्के प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस व लोह खनिजांचे इतर तृणधान्यांच्या तुलनेत अधिक प्रमाण असते.

लायसीन अमिनो आम्लाची आणि लिनोलिक या फॅटी ॲसिडची मात्रा इतर तृणधान्याच्या तुलनेत जास्त असते. पौष्टिक गुणधर्मामुळे या पिकाच्या दाण्यास विविध प्रकिया उद्योगामध्ये वाढती मागणी आहे. राजगिरा पासून लाडू व गुडदाणी बनवितात.

राजगिरा लागवडीचे फायदे

राजगिरा  शेतकऱ्यांसाठी फायदेशीर  पीक ठरते. राजगिऱ्याची  वाढ झपाट्याने होते. हे पीक तणांची वाढ होऊ देण्यास  प्रतिबंध करते. राजगिऱ्यामुळे लव्हाळा देखील आटोक्यात राहतो.

विक्रीतून उत्पन्न

राजगिऱ्याची उगवण दाट होते. त्यामुळे दाण्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी उगवणीनंतर तीन आठवड्यांनी विरळणी करावी लागते. या विरळणी केलेल्या रोपाची भाजी करण्यासाठी वापर होतो.  एकरभरातील भाजी विक्रीतून सुमारे सहा हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते.

सुधारित तंत्राचा वापर केल्यास प्रति हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. जातीनिहाय उत्पादनामध्ये फरक पडत असल्याने अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवडीसाठी शेतकऱ्यांनी निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राजगिरा पिकाची अधिक उत्पादन देणारी फुले कार्तिकी हा वाण लागवडीसाठी प्रसारीत केलेला आहे.

राजगिरा पिकास साधारणपणे रुपये 50 ते 70 प्रति किलो याप्रमाणे बाजारभाव मिळतो. त्यानुसार हेक्टरी एक लाख 25 हजार पर्यंत आर्थिक उत्पन्न मिळते. या पिकावरील पूर्व मशागत, बियाणे, पेरणी, खते, खुरपणी ,काढणी, मळणी व इतर कामे याबाबतचा खर्च वजा जाता या पिकापासून साधारणपणे एकूण मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाच्या 60 टक्के नफा मिळतो.

राजगिरा लागवडीबाबत माहिती..

राजगिरा  द्विदल वर्गीय आणि जलद गतीने वाढणारे पीक आहे. पिकाची महाराष्ट्रामध्ये  सर्वत्र लागवड केली जाते.  या पिकाचे मूळस्थान पूर्व व पश्चिम आशिया व आफ्रिका आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात ,सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यांत आणि बीड जिल्ह्यामध्ये याची पुष्कळ लागवड करतात. माठ, तांदूळ आणि  राजगिरा वनस्पती एकाच वर्गात मोडतात. राजगिरा धान्याचा रंग वेगवेगळ्या जातीनुसार काळा, सोनेरी पिवळा किंवा पिवळसर पांढरा असतो. राजगिरा हरभरा आणि गव्हामध्ये मिश्रपीक म्हणून घेतले जाते. रब्बी हंगामात सलग पीक म्हणून लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते.

जमीन

सामू साधारणपणे 6.5 ते 7.5 असावा. अगदीच हलकी. पाणथळ, चोपण व क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये. जमिनीमध्ये लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून ढेकळे फोडून भुसभुशीत करून एकरी 2 ते 3 टन कुजलेले शेणखत मिसळावे. या पिकाच्या वाढीसाठी थंड व कोरडे हवामान उत्तम राहते. सरासरी 10 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असल्यास या पिकाची चांगली वाढ होते.

पेरणीचा कालावधी

पेरणी साधारण 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान करावी. लागवड करताना बियाणे 1 ते 2 सेंमी पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण योग्य वेळेत आणि चांगली होऊन प्रति एकरी आवश्यक रोपांची संख्या मिळते. लागवड करताना दोन झाडांमधील अंतर 15 सेंमी व दोन ओळीमधील अंतर 45 सेंमी ठेवावे.

बियाणे मात्रा

प्रति हेक्टरी दीड ते दोन किलो बियाणे. सुधारित जाती : अन्नपूर्णा, जी. ए 1, सुवर्णा, फुले कार्तिकी या सुधारित जाती आहेत. फुले कार्तिकी जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे  विकसित केलेली असून 110 ते 120 दिवसांमध्ये ही जात काढणीसाठी तयार होते. ही जात 5 ते 7 फूट वाढते, पाने हिरव्या रंगाची असतात. कणीस लांबट व पिवळ्या रंगाचे असून, लांबी 40 ते 60 सेंमीपर्यंत आहे. पीक पक्व झाल्यानंतर कणसांची कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास दाणे झडतात व उत्पादनात घट होते. सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास प्रति एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पादन मिळते.

पेरणी

बियाणे बारीक असल्याने वाळलेली माती मिसळून दीड फुटी पाभरीने (45 x 15 सें.मी. अंतरावर) एक ते दीड सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करावी.आंतर मशागत: पेरणीनंतर सारे पाडून लगेच हलके पाणी द्यावे. आठ दिवसांच्या आत पिकाची विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे पिकाची वाढ व्यवस्थित होते आणि रोपांतील योग्य अंतर राखले जाते. पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी लहान रोपांची विरळणी करावी. एक ते दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी व भुसभुशीत करावी. कोळपणी नंतर झाडाच्या बुंध्याजवळील मातीच्या भरीमुळे पीक पक्व झाल्यावर पडत नाही. पेरणी नंतर 110 ते 120 दिवसांमध्ये हे पिक काढणीस येते. खत व्यवस्थापन : माती परीक्षणानुसार हेक्टरी 60 किलो नत्र व 40 किलो स्फुरद तसेच 20 किलो पालाश रासायनिक खतांची मात्रा द्यावी. योग्य वेळी देण्यात आलेल्या खतांमुळे पिकाची जलद वाढ होऊन पानांच्या आकार वाढीसाठी फायदा होतो.पीक कालावधी सुमारे साडेतीन ते चार महिने असतो.

(संदर्भ: श्री सुगी रब्बी 2020, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

000000

दत्तात्रय कोकरे

वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here