नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत पाटील

नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर, दि.१४ :  उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्यातील नवीन इमारती व जुन्या इमारत दुरुस्ती  बांधकामास गती देवून ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी येत्या ८ दिवसात निविदा काढण्याचे आदेशही त्यांनी दिले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीबाबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील मॉरीस महाविद्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक  झाली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दसपुते, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव अजित बाविस्कर आदी उपस्थित होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरामध्ये विविध बांधकामे नियोजित असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या कामास गती देण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांनी येत्या आठवड्यात निविदा काढण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (नागपूर) अधिक्षक अभियंते जनार्दन भानुसे आणि कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यावेळी उपस्थित होते. याशिवाय विद्यापीठ कॅम्पस परिसरात टेक्नॉलॉजी ॲण्ड एनर्जी पार्क बांधकाम, प्राचीन इतिहास आणि पुरातत्व संग्रहालय इमारतीचे बांधकाम, तांत्रिक कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत बांधकामासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या दुसऱ्या  टप्याच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था येथे प्रत्येकी २०० मुला-मुलींच्या वसतीगृह बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.

या बैठकीत मुंबई येथील अधिक्षक अभियंता यांनी भारतरत्न लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासंदर्भात सादरीकरण केले. मुंबईतील जवळपास १५ संस्थाच्या नवीन इमारती व अस्तित्वातील इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच  राज्यातील सर्व तंत्र निकेतन इमारतीचे दुरुस्ती व नुतनीकरण कामाचा आढावा घेण्यात आला.

कोल्हापुर  येथील नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  आवश्यक विविध बांधकामाबाबत अधीक्षक अभियंत्यांनी माहिती दिली. पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुलां-मुलींच्या वसतिगृहासंदर्भात अधीक्षक अभियंत्यांनी सादरीकरण केले. रायगड जिल्ह्यातील बाटू लोणेरे, जळगांव येथील प्रस्तावित सह संचालक कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here