‘गुरुशाला’ उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस उपयुक्त ठरणार

‘गुरुशाला’ उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीस उपयुक्त ठरणार




जळगाव, दि. १२ (जिमाका):  अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी विकास प्रशासनाने नवी दिल्ली येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करत ‘गुरूशाला’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे शासकीय आश्रमशाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी निर्माण होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.

राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत 497 शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्ययन स्तर मूल्यमापन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी ‘गुरूशाला’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत 3 वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

हा उपक्रम तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून ‘गुरूशाला’ उपक्रमांतर्गत सन 2024-25 ते 2026-27 या शैक्षणिक वर्षात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनकडून आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि अधिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होईल. दुसऱ्या टप्प्यात शिक्षक-शिक्षिका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण तर तिसऱ्या टप्प्यात अधीक्षक-अधिक्षिका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना अध्यपन प्रक्रियेचे उद्धबोधन होणार आहे.

‘गुरूशाला’ उपक्रमांतर्गत आश्रमशाळा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शाळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 497 प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते.  त्यापैकी 287 प्रकल्प पुढील टप्प्यासाठी पात्र ठरली. त्यात नाशिक अपर आयुक्तालयाच्या 100, ठाणे आयुक्तालयाच्या 91, नागपूर आयुक्तालयाच्या 56 तर अमरावती आयुक्तालयाच्या 40 प्रकल्पांचा समावेश आहे.

‘गुरूशाला’मुळे शिक्षकांच्या अध्यपन तर विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत गतिमानता येईल. अध्ययन सुलभ होऊन पायाभूत क्षमतांचा विकास होईल. परिणामी, आश्रमशाळांचा शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावेल अशी आशा आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी व्यक्त केले आहे.

०००

 







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here