लाठीहल्ल्याचा आदेश ‘वरून’ कुणी दिला?
जालना : ‘केंद्र व राज्य सरकारने मराठा आरक्षणबाबत पुढाकार घ्यावा. लाठीहल्ला प्रकरणी मी पोलिसांना दोष देणार नाही. कारण त्यांना ‘वरून’ आदेश देण्यात आला, असे सांगतात. असे फोन शक्तिशाली लोक करू शकतात. त्यामुळे सरकारमध्ये कोण शक्तिशाली आहे हे शोधावे लागेल,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंतरवाली येथे शनिवारी भेट दिली. त्यापूर्वी अंबड येथे उपजिल्हा रुग्णालयात जखमी आंदोलकांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर अंकुशनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.
३५० आंदोलकांविरुद्ध गुन्हा:
जालना : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेत असताना आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी ३५० आंदोलकांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांनी जरांगे यांना रुग्णालयात नेण्यास विरोध केला. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी पोलिसांची कारही जाळली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश राऊत यांच्या फिर्यादीवरून हृषिकेश बेंद्रे, श्रीराम कुरणकर, राजू कुरणकर, संभाजी बेंद्रे, महारुद्र अंबरुळे, राजेंद्र कोटुंबे, भागवत तारख, दादा घाडगे, पांडुरंग तारख, अमोल पंडित, किरण तारक, अमोल लहाने, वैभव आवटे, किशोर कटारे, अविनाश मांगदरे, मयूर आवटे यांच्यासह ३०० ते ३५० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘सरकारच्या निर्घृणपणाचा हिशेब विचारणार’
जालना : केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा. अन्याय होत असूनही मराठा समाजाने शांततेत मूक मोर्चा काढले होते. तरीही माता-भगिनींवर लाठीमार करण्यात आला. या निर्घृणपणाचा हिशेब विचारणार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रात्री उशिरा आंतरवाली सराटी येथे आंदोलकांची भेट घेतली. या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय राऊत, आमदार राजेश टोपे उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मराठवाड्यातील शेकडो गावांत शनिवारी बंद पाळण्यात आला. रास्ता रोको आणि निदर्शनांमुळे वाहतूक ठप्प झाली. बदनापूर, जालना येथे वाहनांना आगी लावण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार रोहित पवार, खासदार बंडू जाधव, संजय राऊत यांनी आंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलकांची भेट घेऊन विचारपूस केली. राज्य सरकारसोबत आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक झाली, तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. राज्यभरात बंदची हाक देण्यात आली असून, नाशिकमध्ये सोमवारी बंद पाळण्यात येणार आहे.
आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ जालना शहरातील अंबड चौफुली भागात शनिवारी सकाळी आंदोलकांनी रास्ता रोको केला. या वेळी आंदोलकांनी रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला आग लावली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. जमावाला पांगवताना पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर ते जालना महामार्गावर अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्ता अडविला होता. बदनापूर येथे रस्ता अडविल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या भागातही जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जालना मार्गावरील दावलवाडी फाटा, छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गावरील भालगाव फाटा येथेही रास्ता रोको करण्यात आल्यामुळे वाहतूक ठप्प होती. जालना जिल्ह्यात आंदोलनाची धग अधिक होती. अंबड, बदनापूर, घनसावंगी, पैठण, जालना, गेवराई, परतूर, मंठा, माजलगाव, गंगापूर तालुक्यात निदर्शने करण्यात आली.
आंतरवालीत लाठीमाराचे आदेश देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करावे. मराठ्यांनी ५७ मोर्चे शांततेत काढले होते. त्यामुळे आंतरवाली येथील लाठीहल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी. आरक्षणाचा प्रश्न बैठकीच्या माध्यमातून तत्काळ सोडविण्याची गरज आहे.
– उदयनराजे भोसले, खासदार
शिवरायांचे नाव घेऊन सरकार चालवता, स्वराज्य पुन्हा आणायचे म्हणता मग हेच का तुमचे स्वराज्य? मराठ्यांवर गोळी चालवायची असेल, तर आधी मला गोळी घाला. मोगलांच्या पद्धतीने राजकारण करायचे असेल, तर आम्हीही वाट बघत आहोत. आता मराठ्यांसोबत बहुजन समाजही आहे.
– संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार