म्हाडा मुंबई मंडळाने काही वर्षांच्या अंतरानंतर चार हजारांहून घरांची सोडत प्रसिद्ध केली. त्यास अर्जदारांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. या घरांसाठी अर्ज करताना अर्जदारांना योग्य माहिती सादर करण्याचे बंधन आहे. मात्र, घरांसाठी अनेकांकडून त्यात चलाखी केली जाण्याची शक्यता गृहीत धरून त्या अर्जांची योग्य पडताळणी केली जाते. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीतील ४,०८२ घरांसाठी काढलेल्या संगणकीय सोडतीत अंतिम टप्प्यात १ लाख २० हजार १४४ अर्ज वैध ठरले.
१४ ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात आल्यानंतर त्यातील विजेत्यांच्या अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू झाली. तेव्हा, अर्ज भरताना पती, पत्नीने एकच अर्ज भरणे अपेक्षित असताना, अनेकांनी स्वतंत्र अर्ज दाखल केला. ते करण्यामागे सोडतीत घर मिळण्याच्या शक्यतेत वाढ करण्याचा प्रकार ठरतो. त्यासाठीच अर्ज पडताळणी योग्य पद्धतीने केली जाते. विशेष म्हणजे, म्हाडा सोडतीत अर्ज भरताना खोटी माहिती सादर केल्याबद्दल विजेत्यांवर कायदेशीर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याप्रमाणे, संबंधित ७७ अर्जदारांची चलाखी समोर येताच मुंबई मंडळाने त्या विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया लागलीच थांबवली जात असल्याचे पत्र रवाना केले आहे. त्याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्या विजेत्यांचा सोडतीतील घरांवरील हक्क रद्द होऊ शकतो. तसे झाल्यास त्या घरांचा ताबा त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना मिळू शकतो.