पश्चिम भागातील रिंग रोड हा ३८ गावांमधून जात आहे. पश्चिम भागात मावळमधील सहा, हवेलीतील ११, भोर तालुक्यातील पाच गावांमधून हा रिंगरोड जात आहे. त्या गावांच्या मोजणी पूर्ण होऊन आता त्या ठिकाणच्या जमिनींचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे, पूर्व भागातील रिंगरोडची मोजणी ही संपुष्टात येण्यास थोडा विलंब लागत आहे. पुणे ते औरंगाबाद हा द्रुतगती महामार्ग पुरंदर आणि हवेली या दोन तालुक्यांमधून जाणाऱ्या रिंग रोड मार्गावर ‘ओव्हरलॅप’ होत आहेत. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हवेली तालुक्यातील वळती गावाजवळ हा रिंगरोड तसेच महामार्ग येऊन मिळतो. तेथून भोर तालुक्यातील शिवरे येथे मार्ग जोडला जात आहे. त्यामुळे सुमारे ३१ किलोमीटर लांबीचा हा मार्ग रिंग रोड आणि पुणे ते औरंगाबाद या द्रुतगती मार्गासाठी सामाइक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मोजणीला विलंब झाला होता, असे रस्ते विकास महामंडळांकडून सांगण्यात आले.
१२ गावांची मोजणी बाकी
पूर्व भागातील मावळमधील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५ आणि पुरंदर तालुक्यातील सात आणि भोरमधील तीन अशा ४८ गावांचा समावेश आहे. पूर्व भागातील खेड, मावळ तालुक्यातील गावांची मोजणी झाली आहे. तसेच हवेली तालुक्यातील तीन, पुरंदरमधील सात आणि भोर तालुक्यातील एक अशा १२ गावांची मोजणी बाकी असून, आतापर्यंत ३७ गावांची मोजणी झाली आहे. येत्या ऑगस्टपर्यंत उर्वरित गावांची मोजणी पूर्ण करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
‘एनएचएआय’ची आखणी कायम
रस्ते विकास महामंडळाने हवेली, भोर तालुक्यांमधून रिंग रोडची केलेली आखणी आणि एनएचएआयच्या आखणीमध्ये रस्त्यांच्या रुंदीमध्ये फरक होता. एनएचएनएआयने रिंगरोडच्या रस्त्यांची १०० मीटर रुंदी, तर रस्तेविकास महामंडळाने ९० मीटर एवढी रुंदी ग्राह्य धरली होती. त्यामुळे अखेर एनएचएआयने केलेली आखणी कायम ठेवण्यात आली आहे, असे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘इंटरचेंज’साठी पुन्हा मोजणी
एनएचएआयचे द्रुतगती महामार्ग आणि राज्य महामार्ग हे ज्या ठिकाणी मिळतात तेथे इंटरचेंजची रचना रिंग रोड मार्गावर करण्यात आली आहे. त्या कामासाठी आता मोजणी सुरू आहे. पुणे रिंग रोड मार्गावर पुणे ते मुंबई नव्या आणि जुना द्रुतगती महामार्ग, पुणे ते माणगांव, तळेगाव ते चाकण, तळवडे एमआयडीसी, पुणे ते नाशिक, सोलू ते मरकळ, पुणे ते बेंगळुरू, पुणे ते पंढरपूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते नगर असे १७ ठिकाणे आहेत. या ठिकाणी केले जाणारे इंटरचेज हे रिंगरोड भोवती शहराबाहेरून आत प्रवेश करण्यासाठी किंवा शहरातून बाहेर जाण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. त्या ठिकाणी कोणत्या गटातून किती जागा जात आहे याची मोजणी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती रस्तेविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.