शहर परिसरात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून पोलिसांचा वचक कमी झाला की काय असं चित्र आहे. भरदिवसा एका भाजी विक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. तब्बल ६ ते ७ हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हा हल्ला केला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, संदीप आठवले (वय २२) असे हत्या झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. जुन्या सिडकोतील लेखा नगर येथील शॉपिंग सेंटर चौकात ही घटना घडली आहे.
पावणे पाच वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन हल्लेखोर आले. त्यांनी भाजी विक्रेता आठवले याच्यावर धारधार शस्त्राने जोरदार हल्ला केला. पोटात आणि मानेवर जोरदार वार करण्यात आल्याने आठवले याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच अंबड पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच, सहायक पोलीस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागच्या आठवड्याभरात चार हत्या झाल्याच्या घडल्या आहेत. दरम्यान आज भर दिवसा झालेल्या भाजी विक्रेत्याच्या हत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक दहशतीच्या वातावरणाखाली वावरत असून पोलिसांच्या कामगिरीवर देखील सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.