शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 2 :- शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत, त्यांच्यात विचार परिवर्तन व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, यासाठी शासन सर्वतोपरी मदत करील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील उसाटने – नार्हेण फाटा, तळोजा एमआयडीसी रोड येथे आयोजित श्री मलंगगड हरिनाम सप्ताह-अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी  ते बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड,  आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी मंत्री ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, विश्वनाथ महाराज म्हाळुंगे, चेतन महाराज म्हात्रे, दिगंबर शिवनारायण, विष्णू मंगरुरकर, गणपत सांगू देशेकर, गोपाल चेतन, शंकर गायकर, दिनेश देशमुख, गणेश पीर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, वारकरी भाविकांची उपस्थिती पाहून पंढरी अवतरल्याचे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणात हातात टाळ घेवून रिंगणामध्ये आणि दिंडीमध्ये सहभागी होताना देहभान विसरायला झाले. “देवाच्या या दारी उभा क्षणभरी..!  या उक्तीची अनुभूती येऊन देवाच्याच दारी आपण सगळे उभे राहिलो आहोत, असाच भास होत आहे. अखंड हरिनामाने भरलेल्या या वातावरणात सर्व काही विसरायला लावणारी ही अध्यात्मिक ताकद आहे. आमच्या सारख्या राजकारण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये संत महात्मांच्या प्रेरणेने देश आणि समाज कार्यासाठी काम करण्याची उमेद निर्माण होते. मला काय मिळाले, यापेक्षा  मी देश आणि समाजासाठी काय देतो, ही भावना जागृत होते. म्हणूनच राजकीय अधिष्ठानापेक्षा अध्यामिक अधिष्ठान सर्वश्रेष्ठ आहे.

महाराष्ट्राला संतांच्या मार्गदर्शनाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे. संतांचा सन्मान करणे, ही आपली संस्कृती आहे. श्री क्षेत्र मलंगड आणि या भूमीतील पुरातन शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मराठी संस्कृतीचे वैभव असणारा हा वारकरी संप्रदाय जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ईश्वर भक्ती शिकवितो. कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतो. कीर्तनकाराचे महत्त्व आपल्या महाराष्ट्रात खूप आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रत्येक हरिनामाला उपस्थित राहायचे. धकाधकीच्या आयुष्यातूनही ते हरिनामासाठी वेळ काढायचे आणि आम्हालाही सांगायचे. सन्मार्गावर कायम चालत राहण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह ही काळाची गरज आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भारत हा तरुणाईचा देश आहे. या तरुणांमध्ये देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी चांगले करून दाखविण्याची उमेद आहे, ही समाधानाची बाब आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचे तारतम्य महाराष्ट्रात नेहमीच दिसून येते. देव, देश आणि धर्म जपणारी आजची तरुण पिढी आपण तयार करतोय, याची खात्री आजच्या या हरिनाम सप्ताहाच्या प्रतिसादातून दिसून येत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे राम मंदिर निर्माणाचे स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण होत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार. या दिवशी सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे.

राज्यातल्या सर्व पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास केला जातोय. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरास 138 कोटी रुपयांचा निधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मिळवून दिला आहे. अशाच प्रकारे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील सरकारकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारीला जाणाऱ्या भाविकांना शासनाकडून सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत, यापुढे अधिकाधिक सोयी-सुविधा दिल्या जातील. शिवप्रताप दिन साजरा करण्याचा निर्णय या शासनाकडून घेण्यात आला आणि यापुढेही  असे अनेक उपक्रम या शासनाकडून राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

0000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here