मुंबईतील १२७ वर्षांचा बेलासिस पूल होणार ‘जमिनदोस्त’; धोकादायक पुलाची होणार पुनर्बांधणी

मुंबईतील १२७ वर्षांचा बेलासिस पूल होणार ‘जमिनदोस्त’; धोकादायक पुलाची होणार पुनर्बांधणी

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: दक्षिण मुंबईतील वाहतुकीची धुरा सांभाळणारा १२७ वर्षे जुना बेलासिस पूल पाडून नवा पूल उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रेल्वे हद्दीतील पुलाचे तोडकाम करण्यासाठी निविदा प्रक्रिया सप्टेंबर अखेर पूर्ण होणार आहे. मुंबई महापालिकेची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी चार महिने आवश्यक आहेत. यामुळे नव्या वर्षात पूल बंद करून तोडकाम केले जाण्याची चिन्हे आहेत.

आयआयटी मुंबई आणि रेल्वे यांच्या संयुक्त पथकाने शहरातील पुलांची संरचनात्मक तपासणी केली होती, तेव्हा हा पूल धोकादायक ठरवण्यात आला होता. यामुळे तात्पुरती देखभाल केल्यानंतर शहरातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेता या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात, दुःखातून सावरण्याचा प्रयत्न

पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वेकडून पूर्ण करण्यात येणार आहे. पुलाच्या जोडरस्त्याची उभारणी मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. बेलासिस पूल तोडून नवा पूल उभारणीसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पूल तोडून नव्याने उभारणीसाठी कंत्राटदाराला १८ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. सप्टेंबरअखेर रेल्वे हद्दीतील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेने पुलासाठी एकूण ३४ कोटींच्या अंदाजित खर्चाचे काम निश्चित केले आहे. यात २४ कोटी अभियांत्रिकी आणि अन्य कामांचा समावेश आहे. पुनर्बांधणीनंतर नवा पूल सहा मार्गिकांचा असणार आहे. नव्या पुलाची उंची रेल्वेरुळांपासून साडेसहा मीटर उंच असणार आहे. सध्या पुलाची उंची पाच मीटर आहे.

शहरातील आयुर्मान पूर्ण झालेल्या ब्रिटिश बनावटीच्या एका अंडरपाससह १० रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीसाठी महारेलला नियुक्त केले होते. यात बेलासिस पुलाचा समावेश होता. बेलासिससाठी महारेलने १५० कोटींचा अंदाजित खर्च महापालिकेकडे सादर केला होता. मात्र महापालिका आणि पश्चिम रेल्वे यांच्यात झालेल्या बैठकीत रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे आणि पालिका हद्दीतील काम महापालिकेने करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या पुलासाठी ९० ते १०० कोटींचा खर्च अंदाजित आहे. त्यानुसार रेल्वे आणि महापालिकेने स्वतंत्र निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

नव्या वर्षात पूल बंद?

सन १८९३मध्ये उभारण्यात आलेला बेलासिस पूल आयआयटी-रेल्वे अहवालात धोकादायक ठरवण्यात आला आहे. पुलासाठी पश्चिम रेल्वेची निविदा प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात, तर महापालिकेची चार महिन्यांनी पूर्ण होणार आहे. पूल बंद केल्यानंतर नागरिकांना अधिक त्रास होऊ नये म्हणून दोन्ही यंत्रणांनी एकाचवेळी काम सुरू करण्याची वरिष्ठ पदस्थ अधिकाऱ्यांची भूमिका आहे. यामुळे नव्या वर्षात अर्थात जानेवारी २०२४मध्ये पूल बंद करून त्याचे तोडकाम आणि पुनर्बांधणी होण्याची शक्यता आहे.

मुंबई सेंट्रल ते बोरिवली प्रश्न अखेर सुटला, रुळालगतच्या इमारतीचा अर्धा भाग तोडण्याचे कोर्टाचे आदेश

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here