मुंबई, दि. २४: मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
जपान दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सीमा देव यांच्या निधनाची बातमी समजताच ते भावूक झाले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस अपल्या संदेशात म्हणतात की, ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. ‘आनंद’ चित्रपटातील त्यांची भूमिका संस्मरणीय होती. त्यांनी एक मोठा कालखंड गाजवला. गत वर्षीच रमेश देव आपल्यातून निघून गेले आणि आज सीमाताई! ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या त्या साक्षीदार होत्या. यशाची शिखरे चढूनही त्यांच्यात असलेला नम्र भाव उल्लेखनीय होता.
त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या. त्यांचे आपल्यातून निघून जाणे सिने जगतातील एका अध्यायाची अखेर आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !
०००