मनसेचे नेते या रस्त्यावरुन चालले आहेत. या रस्त्याची काय चाळण झालेली आहे. गेली अनेक वर्षे कोकणी माणसांना हे सहन करावं लागतं आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळं किती अपघात झाले असतील, किती माणसं गेली असतील. रस्त्यावरील खड्डा भरता येतो, माणसाचं आयुष्य नव्हे. गेल्या १५ वर्षात या रस्त्यावरील अपघातात अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे. एका ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. किती पैसे खायचे याला काही मर्यादा आहे की नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ मध्ये मुंबई- पुणे अंतर दोन तासात गाठायचंय असा रस्ता बांधायचाय असं म्हटलं होतं. महाराष्ट्र नेहमी पुढारलेलाच होता. तो रस्ता पूर्ण झाल्यानंतर देशाला कळलं की असा रस्ता बांधला जाऊ शकतो. मुंबई पुणे रस्त्याचं बांधकाम झालं तेव्हा नितीन गडकरी पीडब्ल्यूडी मंत्री होते. ज्या महाराष्ट्रानं हा आदर्श घालून दिला त्या महाराष्ट्रात असा रस्ता आहे. याचं कारण तुम्हाला राग येत नाही. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही त्याच त्याच लोकांना निवडून देतो. आम्ही भावनेला हात घालतो आणि मतदान करतो. गेली इतकी वर्ष काही भोगतोय याचा साधा विचार देखील करत नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.
कोकणी माणसाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की असा रस्ता ठेवण्याचं कारण सांगतो की तुमच्या जमिनी चिरीमिरीनं विकत घेण्यासाठी हे काम सुरु आहे. रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं १०० पट दरानं जमिनी विकणार आहेत. कुंपणचं शेत खात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. रस्ता चालू होतो, दळणवळण सुरु होतं त्यावेळी भाव वाढतात. त्यामुळं जमिनी विकू नका, व्यापाऱ्यांच्या हाताखाली जमिनी घालू नका. त्यांना काय रट्टे लावायचे आहेत ते लावू, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं तर एक दिवस पोलीस स्टेशनला चड्डीवर बसवलं होतं. सत्ता कुणाचीही असो मी त्यांना सांगतो कुणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. त्या गोष्टीचं रिटर्न गिफ्ट मी देखील देऊ शकतो, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.