आमदार सतेज पाटलांवर टीका
कोल्हापुरात दहा कोटी रुपयांचं इनडोअर स्टेडियम मंजूर करण्यात आलं होतं. शासनाची मंजुरी मिळाली, बजेट ठरलं, जागाही निश्चित झाली आणि वर्क ऑर्डर निघण्याआधीच हा निधी दुसऱ्या कामांसाठी वळवण्यात आल्याच्या आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर केला, याला खासदार महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सतेज पाटील यांनी अनेक गोष्टींमध्ये ‘ढपला’ पाडल्याचं त्यांच्याच गटातून फुटलेल्या नगरसेवकांनी सांगितलं आहे. थेट पाईपलाईन पासून अगदी मैदानांच्या कामांपर्यंत सतेज पाटील यांनी काय काय केले आहे, असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांना पोटशुळ उठल्याची टीका खासदार महाडिक यांनी केली. यामुळे येणाऱ्या निवडणुकीत खासदार महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
कन्हैया कुमारची ओळख काय?
देश आणि राज्यभरात काँग्रेसचे बडे नेते असताना कन्हैया कुमारला जाहीर सभेसाठी बोलावून कोल्हापूरच्या काँग्रेसने स्वतःचं हसं करून घेतलं आहे, अशी टीका महाडिक यांनी केली. कोण आहे कन्हैया, त्याची स्वतःची ओळख काय? असा सवाल धनंजय महाडिक यांनी केला.
स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात रविवारी सद्भावना दौंडचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. कन्हैया कुमारच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कन्हैया कुमारला अशा कार्यक्रमाला बोलवावे लागते, देशात आणि राज्यात काँग्रेसचे बडे नेते असताना कोल्हापूरच्या कार्यक्रमाला कन्हैया कुमारला आमंत्रित करून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसने अपयशी ठरल्याचे सिद्ध केल्याचे खासदार महाडिक यावेळी म्हणाले.