मंत्री छगन भुजबळ नाशिकच्या मखमलाबाद येथील शाळेत एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणातील वक्तव्यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. भाषणादरम्यान त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आणि सरस्वती देवी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना भुजबळ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली.
छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी छगन भुजबळ यांच्या कानशिलात लगावणाऱ्याला एक लाख रुपयांचा बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांना आज धमकीचा फोन आला. मागच्या काही दिवसांपूर्वी देखील छगन भुजबळ यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. या धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आता छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान या धमकी प्रकरणावर स्वतः छगन भुजबळ यांना विचारले असता ‘हे चालूच राहते अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही तुम्हीही घाबरू नका’ अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. भुजबळ यांना सत्तेत आल्यापासून दोन वेळा धमकी येऊन गेली आहे. पहिल्यांदा त्यांच्या कार्यालयात जिवे मारण्याचा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर तो मद्यपी असल्याचे समोर आले होते त्यानंतर आज पुन्हा त्यांना फोनवरून धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत छगन भुजबळांच्या समर्थनासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.