लोकशाही, सुशासन बळकट करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

लोकशाही, सुशासन बळकट करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उदयपूर दि. 21 : आजचा काळ हा डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशाच्या संसदेत राज्याच्या विधिमंडळामध्ये होत असलेल्या कामकाजाची माहिती सर्व नागरिकांपर्यंत सहजपणे पोहोचण्यास मदत होत आहे. नागरिक टीव्ही, मोबाईल, संगणक यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, लोकप्रतिनिधीने संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये उठविलेल्या प्रश्नांबद्दल जाणून घेऊ शकत आहेत.  यामुळे देशात डिजिटल तंत्रज्ञानामुळे लोकशाही आणि सुशासन बळकट होण्यासाठी मदत होत असल्याचे  मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

नववी राष्ट्रकुल संसदीय मंडळ  (CPA) भारत- प्रादेशिक परिषद राजस्थान येथील उदयपूर येथे सुरू झाली. राष्ट्रकुल संसदीय मंडळ भारत क्षेत्राच्यावतीने राजस्थान विधानसभा आणि राष्ट्रकुल संसद संघटना, राजस्थान शाखेद्वारे आयोजित प्रादेशिक परिषद राष्ट्रकुल संसद सदस्यांना त्यांचे संसदीय लोकशाहीचे अनुभव मांडण्यासाठी संमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्यात राष्ट्रकुल संसद सदस्य लोकशाही आणि सुशासन वाढविण्यासाठी डिजिटल प्रतिबद्धतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ भारत क्षेत्राचे अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल संसद संघटनेच्या नवव्या भारत- प्रादेशिक परिषदेचे उदघाटन केले. याप्रसंगी राष्ट्रकुल संसद संघटनेचे अध्यक्ष, इयान लिडेल-ग्रेंजर खासदार आणि राष्ट्रकुल संसद संघटनेचे महासचिव स्टीफन ट्विग प्रादेशिक परिषदेत सहभागी झाले होते. तसेच संघीय आणि राज्यस्तरावरील संसद सदस्य उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, डिजिटल तंत्रज्ञानामुळे थेट लाभ हस्तांतरणासारखी प्रक्रिया राबविता आली. ज्यामुळे  १०० टक्के नफा लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होण्यास मदत झाली आहे. प्रधानमंत्री रोजगार योजना, रेशन आणि सार्वजनिक वितरण प्रणाली, शिष्यवृत्ती, शैक्षणिक संस्थामध्ये दाखला, स्पर्धा परीक्षा, विविध योजनांमध्ये लाभार्थींची भरती, कृषी आणि ग्रामीण विकासाचे लाभ, महिला आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण, महिला सक्षमीकरण, कायदे आणि न्याय प्रणाली यांसारख्या सर्वच क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाने क्रांती घडवून आणली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात शाश्वत विकासाची उद्दिष्टे राबविण्यासाठी या तंत्रज्ञानामुळे सुलभता आली असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. स्त्री-पुरुष समानतेसाठी डिजिटल क्रांतीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून स्त्रियांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचे काम त्यातून झाले आहे. असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. याचप्रमाणे ऊर्जा, आर्थिक उन्नती, पायाभूत सुविधा, नगर विकास यांसारख्या क्षेत्रात डिजिटल सशक्तिकरणामुळे सुशासन घडवून आणण्यास मदत झाली आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या मतदारसंघात करून सुशासन राबविण्यास पुढाकार घेतला पाहिजे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here