नियोजन समितीच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील, खा. उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकीत, उपायुक्त मच्छिंद्र भांगे, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जळगाव ते चाळीसगाव रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी, जिल्ह्यात ४५० कामांसाठी ९३९ कोटी रूपयांचा निधी मंजूर असतांना कामांचे कार्यादेश दिले जात नसल्याची तक्रार केली. पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना जाब विचारला. यावेळी आ. चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडून अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या नावाखाली ब्लॅकमेलींग होत असल्याचा खळबळजनक आरोप केला.
मंत्री महाजनांकडूनही खडसेंवर टीका
विरोधी पक्षात राहून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलींग करुन आपल्या घरी अधिकारी पोसायाचेच काम खडसेंनी केल्याची टीका यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. बोरसे नावाचा अधिकारी त्यांच्या घरी कामाला लावला होता. दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतांना आपण स्वत: किती शुध्द आहोत, हे त्यांनी सांगावे असा टोलाही महाजन यांनी लगावला.
नाव न घेता खडसेंच्या निषेधाचा ठराव
यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही मुक्ताईनगरात कामे होऊ दिली जात नाही. प्रत्येक कामात अडथळा निर्माण केला जातो असे सांगितले. तर आमदार किशोर पाटील यांनीही कामे थांबविणाऱ्यांचा निषेध केला पाहीजे असे सांगितले. खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासात कुणी अडचण निर्माण करत असेल तर खडसेचे नाव न घेता अशा झारीतील शुक्राचार्याच्या निषेधाचा ठराव मंजूर करण्याची विनंती केली. त्यावर सभागृहाने अनुमोदन दिले.
२० हजार मेट्रीक टन युरियाचा तुटवडा
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पीकांची स्थिती सध्यातरी चांगली आहे. या चांगल्या स्थितीतही कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना युरीया मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हा कृषी अधिकारी यांन नियोजन समितीच्या बैठकीत २० हजार मेट्रीक टन युरीयाचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती दिली.