दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

मुंबई, दि. 13 : सर…. तुमच्या मदतीमुळे आम्ही आजारांविरुद्धची लढाई जिंकली आहे… आता फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा… आमच्या जीवनातील लढाईवरही आम्ही मात करु….. अशीच काहीशी भावना त्या लहान मुलांच्या आणि त्यांच्या आई – वडिलांच्या डोळ्यातून व्यक्त होत होती… निमित्त होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमाचे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्थसहाय्याने  हृदयशस्त्रक्रिया, कॅन्सर, जन्मतः मूकबधिर (कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया), बोन मेरो ट्रान्सप्लांट आदी दुर्धर आजारांवर मात केलेल्या 50 लहान मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, दिवाळी हा कौटुंबिक कार्यक्रम असून गेल्या वर्षी मी याच ठिकाणी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. आता आपल्यासोबत दिवाळी साजरी करीत आहे. सर्वसामान्यांसोबत राहून त्यांच्या अडीअडचणीत मदत करण्याचे काम गेले कित्येक वर्ष आम्ही करीतच आहोत. तेच काम आम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व महात्मा फुले जनआरोग्यसारख्या विविध योजनांतून सर्वसामान्यांसाठी करीत आहोत. राज्यातील सर्व जिल्ह्यांत आरोग्य सोयीसुविधा पोहोचविण्याचे काम अखंडपणे सुरु असून, राज्यातील कुठलाही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची काळजी शासन घेईल. आजार होऊ नये यासाठीच आपण प्रयत्न करीत आहोत. राज्यात जे उपचार उपलब्ध नाहीत ते परदेशातून उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात कॅशलेस सेवा सुरु करण्याबाबतही प्रयत्न सुरु आहेत. कोरोना काळातही आपण सर्वांनी चांगले काम केले असून यावर्षी दिवाळीसह सर्व सण उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरे करीत आहोत.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, एचसीजी (HCG) मानवता कॅन्सर हॉस्पिटल, नाशिकचे डॉ.राज नगरकर, ठाणे येथील भूमकर हॉस्पिटलचे डॉ.आशिष भूमकर, यशश्री हॉस्पिटल सांगलीचे कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.सुधीर कदम, ज्युपिटर हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आशुतोष सिंह, डॉ.श्रीनिवास सर, कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.अजय ठक्कर, डॉ.उप्पल सर, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.

तसेच यावेळी उपस्थित मुलांच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री सहायता कक्षातून मिळालेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. दुर्धर आजारांवर मात केलेल्या उपस्थित लहान मुले आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here