समाजदिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शैक्षणिक संकुलात झालेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, ‘मी ब्राह्मणांवर टीका करीत नाही.… ब्राह्मण वर्ग सोडल्यास तुम्ही-आम्ही शूद्र. त्यानंतर मग अतिशूद्र. शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतेच शिक्षण मर्यादित होते.’ संभाजी भिडे यांचे खरे नाव मनोहर कुलकर्णी असून, ब्राह्मण समाजात कोणीही शिवाजी-संभाजी नाव ठेवत नाही. त्यामुळे इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, असे म्हणून ‘ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या, त्यांनी सर्वांना का नाही शिकवले,’ असा प्रश्नही उपस्थित केला. ‘आपले देव ओळखायला शिका,’ असा सल्लाही भुजबळांनी या वेळी दिला. ‘शाळा, महाविद्यालयांत मेरिटमध्ये अनेक मुली असतात, त्यात मुस्लिम मुलीही असतात. ते पाहिल्यावर समाधान वाटते,’ असेही भुजबळ म्हणाले.
‘सरस्वती-शारदेने
आम्हाला शिकवले नाही’
‘काहींना सरस्वती आवडते, काहींना शारदा आवडते. आम्ही काय त्यांना पाहिलेले नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिले नाही. आम्हाला शिक्षण दिले ते या फुले, शाहू, आंबेडकरांसारख्या महापुरुषांनी. त्यामुळे ते आमचे देव आहेत. ते तुमचेही देव असले पाहिजेत,’ असे विधानही भुजबळ यांनी केले. यामुळे पुन्हा नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
भुजबळ म्हणाले…
– शाहू- फुले- आंबेडकरांचा वारसा सोडणार नाही.
– इतिहास मोडणाऱ्यांविरुद्ध उभे राहावे लागेल.
– मेरिटमधील सर्वधर्मीय मुली पाहून समाधान वाटते.