काय आहे संपूर्ण घटना?
जिल्ह्यातील मूर्तिजापुर ग्रामीण पोलिस स्टेशब हद्दीतील उमरी येथे पतीने पत्नीवर हातोड्याने हल्ला केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली होती. यामध्ये पत्नी गंभीररीत्या जखमी झाली, तिला आधी अकोला व नंतर नागपूरला उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान काल गुरुवारु तिचा मृत्यू झाला.
उमरी गावातील प्रकाश खंडारे यांची मुलगी पुनम हिचा विवाह काही वर्षांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील मोरड गावातील रहिवासी समाधान गौतम राऊत याच्यासोबत झाला होता. लग्नाच्या सुरुवातीला काही दिवस चांगले गेले नंतर दोघांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद होऊ लागले. हा वाद असह्य झाल्याने पुनम गेल्या काही महिन्यांपासून तिच्या माहेरी वडिलांकडे राहायला आली. दरम्यान, १३ ऑगस्टला पुनम घरी एकटी होती. वडील शेतात कामाला गेलेले होते, तिचा पती समाधान हा घरी आला अन् त्याने पत्नीला सोबत चल म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला. अनेकदा विनवणी केली, परंतु पुनमचा संसार थाटण्यास नकार होता. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाच रूपांतर इककं झाल की त्याने थेट रागाच्या भरात पत्नी पुनमच्या डोक्यात हातोड्याने वार केले. यात ती गंभीररीत्या जखमी झाली. त्यानंतर समाधान घटनास्थळावरून फरार झाला. पुनमच्या डोक्याला मार लागल्याने कुटुंबीयांनी तिला मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, रक्तस्त्राव जास्त झाल्याने पुढील उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पुढे नागपूरला हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना गुरुवारी पुनमचा मृत्यू झाला.
हे प्रकरण गांभीर्यानं घेत मूर्तिजापूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी लागलीच हल्ल्याच्या रात्रीच आरोपी समाधान राऊतला याला ताब्यात घेतले होते. पुनमच्या मृत्यूनंतर पतिआरोपीविरुद्ध कलम ३०२ खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरेंद्र राऊत करीत आहेत.