ऊर्जा निर्मितीसाठीच्या सामंजस्य करारामुळे अर्थव्यवस्था वाढीस गती, ६२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊर्जा निर्मितीसाठीच्या सामंजस्य करारामुळे अर्थव्यवस्था वाढीस गती, ६२ हजाराहून अधिक रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंप स्टोरेजचे राज्यात विक्रमी करार; एकूण १ लाख ८८ हजार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक

मुंबई, दि. 3 : जल विद्युत ऊर्जा निर्मितीसाठीच्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी, वेलस्पन न्यू एनर्जी, एन एच पी सी, रीन्यू हायड्रो पावर, टी एच डी सी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. एकूण 35 हजार 240 मे.वॉ.चे वीजनिर्मिती करार करण्यात आले. या करारामुळे राज्यात एकूण 1 लाख 88 हजार 750 कोटी रुपयांची गुंतवणूक तर 62 हजार 550 एवढी रोजगार निर्मिती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याची एकूण स्थापित क्षमता 46 हजार मेगावॉट त्यातून 40 हजार 870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने ग्रीन एनर्जी क्षेत्रात हे राज्याचे मोठे पाऊल आहे. यापूर्वीही राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत लक्षणीय पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

२०३० पर्यंत राज्यातील ५० टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक साधनांतून होणार आहे. नैसर्गिक  संसाधनांचा वापर करून ऊर्जा शाश्वत पद्धतीने निर्माण करू शकतो. राज्यात पश्चिम घाटात विशेष जैवविविधता आहे. तेथे अनेक ठिकाणी शीतगृहांसाठी ऊर्जेचा वापर होणार आहे. शासकीय आणि खाजगी क्षेत्राने उत्सुकतेने हे करार पूर्णत्वास नेण्यास सहकार्य केले आहे. यामुळे राज्यासाठी शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस सहकार्य लाभणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी विविध सात कंपन्यांअंतर्गत होणाऱ्या करारासंदर्भात अधिक माहिती दिली. नॅशनल थर्मल पॉवर कंपनीअंतर्गत ९ हजार ७८ कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे तर १ हजार ४०० रोजगार निर्मिती, १ हजार ८०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. वेल्सपन न्यु एनर्जी कंपनी अंतर्गत ५ हजार कोटी गुंतवणूक तर १ हजार ५०० रोजगार निर्मिती, १ हजार २०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

एनएचपीसी लिमिटेड अंतर्गत ४४ हजार १०० कोटी इतकी गुंतवणूक, ७ हजार ३५० रोजगार निर्मिती आणि ७ हजार ३५० मेगा वॅट वीज निर्मिती होणार आहे. रिन्यु हायड्रो पावर लिमिटेड अंतर्गत १३ हजार १०० कोटी गुंतवणूक, ५ हजार रोजगार निर्मिती, २ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे.

टेहेरी हायड्रो डेव्हलपमेंट कार्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत ३३ हजार ६२२ कोटी गुंतवणूक, ६ हजार ३०० रोजगार निर्मिती तर ६ हजार ७९० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. टोरन्ट पावर लिमिटेड अंतर्गत २८ हजार कोटी गुंतवणूक १३ हजार ५०० रोजगार निर्मिती, ५ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत ५४ हजार ४५० कोटी इतकी गुंतवणूक, ३० हजार रोजगार आणि ९ हजार ९०० मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव डॉ.कपूर यांनी दिली.

यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्यासह अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय अधिकारी आणि खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले.

००००

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here