महाराष्ट्र सदन येथे १३ जानेवारीपर्यंत भौगोलिक मानांकन उत्पादने विक्री प्रदर्शन – महासंवाद

महाराष्ट्र सदन येथे १३ जानेवारीपर्यंत भौगोलिक मानांकन उत्पादने विक्री प्रदर्शन – महासंवाद

नवी दिल्ली, दि. 10 : कस्तुरबा गांधी स्थित महाराष्ट्र सदन येथे नाबार्डच्या सहकार्याने आजपासून 13 जानेवारी पर्यंत भौगोलिक मानांकन (GI) असलेल्या उत्पादनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील स्थानिक उत्पादनांचा समावेश असून, ग्रामीण भागातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

या प्रदर्शनाची उद्घाटन प्रभारी निवासी आयुक्त निवा जैन यांच्या हस्ते आज झाले. यावेळी नाबार्ड चे सहाय्यक महाव्यवस्थापक रवींद्र मोरे, महाराष्ट्र सदनच्या व्यवस्थापिका भागवंती मेश्राम, बांधकाम विभागाचे अभियंते जे. डी. गंगवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील येवलेमधील भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले दिवटे पैठणी या दालनात पैठणी, सेमी पैठणी, हातमागच्या साड्या तसेच पैठणीच्या जॅकेट, टोपी, हॅन्डबॅग ठेवण्यात आले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील तालुका धडगाव येथील बोंदवाडे मधील ‘आमु आखा एक से’ या शेतकरी उत्पादक कंपनीची   आमचूर पावडर, तसेच या जिल्ह्यातील डॉक्टर हेडगेवार सेवा समितीतर्फे भौगोलिक मानांकन प्राप्त झालेली भडक लाल मिरचीचे दालन आहे.

कोल्हापूरमधील कोल्हापूर एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट येथील प्रसिद्ध गूळ, सांगली जिल्ह्यातील मिरज येथे तयार होणारे तानपुरा आणि सितार यांनाही मानाची भौगोलिक मानांकन मिळालेले असून या वाद्यांची छोटी प्रतिकृती मांडलेली आहे.

अकोला जिल्ह्यातील ग्रामपुत्रा जीविक शेती मिशन, शेतकरी उत्पादक कंपनी खापरवाडा यांचे सेंद्रिय मसाले आणि हळद यांचा समावेश आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राधिका महिला बचत गट अंतर्गत तयार करण्यात येणारे काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, शेंगदाणा, जवस, तीळ, कारळ यांच्या चटण्याही या  स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, भौगोलिक मानांकन मिळालेल्या वस्तू खरेदी कराव्या आणि ग्रामीण भागातील उत्पादकांना सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here