बारामतीच्या वैभवात भर घालणारी शिवसृष्टी उभारा-उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

बारामतीच्या वैभवात भर घालणारी शिवसृष्टी उभारा-उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

बारामती, दि.५: छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल यादृष्टीने प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून बारामतीच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी, बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.

श्री. पवार यांनी तालुका फळरोपवाटिका, शिवसृष्टी, जलतरण तलाव, कन्हेरी वनोद्यान येथे सुरूअसलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शिवसृष्टीची कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याबाबत दक्षता घ्यावी. शिवसृष्टीचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना हेवा वाटेल, असे कामे करावीत. परिसरात अधिकाधिक वृक्षाची लागवड करुन संपूर्ण परिसर हिरवेगार राहील, असे नियोजन करावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी,याकरीता आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

तालुका फळरोपवाटिका कन्हेरी दुरुस्तीची किरकोळ कामे पूर्ण करुन घ्यावीत. संरक्षक भिंती आणि रस्ताच्या बाजूला वृक्षारोपण करावे. परिसरात शोभिवंत झाडे लावावीत. कुंड्यामध्येही वाढ करावी. आंबा, नारळ, सीताफळ येथील मातृवृक्षाची पाहणी करून त्याची व्यवस्थितपणे देखभाल  करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

कन्हेरी वनोद्यान परिसरातील विकास कामे करीत असताना  कमी प्रमाणात पानगळ होणारी, सरळ वाढणारी, अधिकाधिक सावली देणाऱ्या स्थानिक प्रजातींचे वृक्षारोपण करा. वृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यावे.

प्रवेशद्वाराला वनोद्यानाशी सुसंगत रंगरंगोटी करावी. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेदृष्टीने तसेच चढतांना-उतरतांना अडथळा निर्माण होणार नाही, अशा पायऱ्याची व बैठक व्यवस्था करावी. तलावात नौकाविहार सुरु करावे. तलावातील पाण्यासह परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. कामे झाल्यानंतर ती नैसर्गिक वाटली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलतरण तलावाची कामे करताना दर्जेदार, टिकाऊ फरश्या बसवाव्यात. भिंती, फरशांमधील फटी राहता कामा नये.  महिलांच्या सुरक्षिततेचाही विचार करण्यात यावा. नागरिकांना चढ-उतर करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या बसवाव्यात. विकासकामे करताना कॅनलच्या भिंतीला अडथळा निर्माण होणार नाही,याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे,तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

०००

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here