कोल्हापूरचा शाही दसरा सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या परंपरेचे प्रतीक – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूरचा शाही दसरा सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या परंपरेचे प्रतीक – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

 कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाची दिमाखात सुरुवात 

 पर्यटन मोबाईल ॲप, पर्यटन सुविधा केंद्र आणि पर्यटक सामान सुरक्षा केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

 कोल्हापूर, दि.१५ (जिमाका): सर्वांना बरोबर घेऊन जाणारी कोल्हापूरची परंपरा आहे आणि त्याचेच प्रतीक हा शाही दसरा आहे असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी शाही दसरा कोल्हापूरचा या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभावेळी केले.

पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर आयोजित शाही दसरा महोत्सवाचा प्रारंभ समारंभ व पर्यटन सुविधा केंद्राचे उद्घाटन भवानी मंडप येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व श्रीमंत  शाहू महाराज छत्रपती यांच्या विशेष उपस्थितीत पार पडले. उद्घाटन प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पर्यटन उपसंचालक शमा पवार, माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, अमित कामत, संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शाही दसरा कोल्हापूरचा या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभावेळी पागा इमारतीमधील पर्यटक सुविधा केंद्राचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पर्यटक सामान सुरक्षा केंद्राचे उद्घाटन झाले. मुख्य कार्यक्रमात शाही दसरा कॅलेंडरचे अनावरण, “डेस्टिनेशन कोल्हापूर” या पर्यटन ॲपचे उद्घाटन करण्यात आले.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले की,  कोल्हापूरच्या दसऱ्यात सर्वजण सहभागी होत असतात, सर्वजण एकत्र येतात. सर्व जनतेसाठी असलेल्या या शाही दसऱ्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. गेल्या वर्षापासून शाही दसरा महोत्सव सुरू झाल्याने चांगलं वातावरण पुन्हा निर्माण करण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जातोय. हा दसरा महोत्सव अधिक व्यापक करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक सुविधा निर्माण करण्याकडे लक्ष दिले जात आहे. भाविकांसाठी रांगांची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, माहिती देणाऱ्या केंद्राची व्यवस्था, पिण्यासाठी पाणी इत्यादी सुविधा नव्याने निर्माण केल्या जात आहेत.

शाही दसऱ्यातून कोल्हापूरचे वैभव, परंपरा जगभर जातील – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरचे वैभव, कोल्हापूरची परंपरा जगभर पोहोचण्यासाठी शाही दसरा महोत्सवाची निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जगभरात शाही दसरा पोहोचावा यासाठी प्रशासनाकडून उत्कृष्ट आखणी केली आहे. भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधाही निर्माण केल्या आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करून या वैभवशाली ऐतिहासिक दसरा महोत्सवाला आपल्या नातेवाईकांसह बाहेरील मित्रमंडळींना निमंत्रित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. येणाऱ्या संपूर्ण नवरात्रोत्सवात शाही दसऱ्याच्या दरम्यान आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन यावर्षीच्या दुसऱ्या शाही दसरा महोत्सवात राज्य शासनाकडून राज्यस्तरावरील महोत्सवाचा दर्जा दिल्याने आता शासनाकडून निधीची तरतूद होईल. यामुळे एक आगळावेगळा उत्साह या शाही दसऱ्यात निर्माण झाल्याचे ते म्हणाले. वसा आणि वारसा असलेल्या या दसरा महोत्सवात आपल्या पै-पाहुण्यांना निमंत्रित करा असे आवाहनही त्यांनी कोल्हापूरकरांना केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापूरचा वारसा, परंपरा जगभर पोहोचावा हा यामागील शाही दसऱ्याचा उद्देश असल्याचे सांगितले. त्यांनी छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या सहकार्याने सर्व सुविधा भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाल्याचे सांगितले. कोल्हापूरचे ऐतिहासिक भव्य स्वरूप लोकांपर्यंत आणण्याचा हा प्रयत्न शाही दसऱ्यातून केला जातोय असे ते यावेळी म्हणाले.

पर्यटक सुविधा केंद्रात प्रथमच चार अंध दिव्यांग युवकांना माहिती देण्यासाठी नेमले आहे. या कार्यक्रमात शाही दसरा नियोजन समितीच्या विविध सदस्यांचा सन्मान महोत्सवाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी करण्यात आला. महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी आभार मानले.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here