मुंबई, दि. ३ : खारफुटी जंगलांच्या जमीनीवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. हे अतिक्रमण थोपविण्यासाठी उपाययोजना शोधाव्यात अशा सूचना खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित खारभूमी विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
खारभूमी विकास मंत्री श्री गोगावले म्हणाले की, कोकणात जमीन धारण क्षेत्र कमी आहे. त्यातच या जमिनीवर खारफुटी जंगलांचे अतिक्रमण होत आहे. ही गंभीर समस्या आहे. हे अतिक्रमण थोपवले नाही तर भविष्यात कोकणातील शेतकरी मोठ्या अडचणीत येऊ शकतो. तसेच किनारपट्टीची शेत जमीन नाहीशी होण्याचा धोका आहे. सध्या पर्यावरण कायद्यामुळे खारफुटीची तोड होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या समन्वयाने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशा सूचना मंत्री श्री. गोगावले यांनी दिल्या.
बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, खारभूमी विकास मंडळाचे मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
०००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ