ससून डॉकमध्ये कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक – मंत्री नितेश राणे – महासंवाद

ससून डॉकमध्ये कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक – मंत्री नितेश राणे – महासंवाद




मुंबई, दि. ०३: ससून डॉकमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ससून डॉक परिसरातील पायाभूत सुविधांची कामे विहित कालावधीत करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्री श्री. नितेश राणे यांनी ससून डॉक परिसराची पाहणी करून अधिकारी, कर्मचारी व मत्स्यव्यवसायिक यांच्याशी संवाद साधला. मत्स्यव्यवसाय विभागाची इमारत, ससून डॉकमध्ये आवश्यक तेथे दुरुस्तीची कामे तत्काळ करावीत. परिसरात अत्यावश्यक असणारी कामे गतीने करावी. तसेच ससून डॉक परिसरात कार्यरत सर्व कामगारांकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळखपत्र असणे आवश्यक आहे, याबाबतही मत्स्यव्यवसाय विभागाने काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना श्री. राणे यांनी दिल्या.

मंत्री श्री.राणे म्हणाले की, ससून डॉक हे सर्वात जुने बंदर असून, मुंबईतील सर्वात मोठा घाऊक मासळी बाजार आहे. ससून डॉक अंतर्गत मासेमारी परवानाधारक नौका, मच्छिमारी सहकारी संस्थाशीत गृह, ससून डॉक बंदरावर आवश्यक असणाऱ्या सोयी -सुविधा, पाणी पुरवठा व्यवस्था, मासे लिलावासाठी शेड उभारणी, नवीन धक्का दुरूस्तीकरण ही कामे प्राधान्याने पूर्ण करावी. स्वच्छता गृहांची उभारणी करावी. मत्स्यव्यवसायिकांना कोणत्याही अडचणी येवू नयेत यासाठी  विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना व इतर अनुषंगिक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळाचे संचालक पंकज कुमार, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त (सागरी) महेश देवरे यासह मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी नीरज चाचकर, मुंबई शहरचे मत्स्यव्यवसाय अधिकारी पुलकेश कदम,ससून डॉकचे कार्यकारी अभियंता(प्रशासक)दीपक पवार यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

 







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here