सोलापूर, दिनांक ३ (जिमाका):-उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९६.९२ टक्के इतका उपलब्ध आहे. मागील वर्षी ६६ टक्के पाणी उपलब्ध होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये. तसेच सोडलेल्या अवर्तनातून पाण्याची बचत करावी, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) श्री. विखे पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, राजू खरे, अभिजीत पाटील, नारायण पाटील, उत्तम जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, महापालिका आयुक्त शितल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव सु. सा. खांडेकर, अधीक्षक अभियंता धीरज साळी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन संतोषकुमार देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागाचे अन्य अधिकारी व कालवा सल्लागार समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे युवा कल्याण व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले, उजनी प्रकल्पाच्या पाण्याचे सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी व शेतकरी, नागरिक यांच्या सहकार्यातून अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जलसंपदा विभागामार्फत ४ जानेवारी, १ मार्च व १ एप्रिल अशा एकूण ३ पाळ्या पाणी सिंचनासाठी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतु दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी सिंचनासाठी पहिले आवर्तन उजनी धरणातून सोडल्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेऊन उपलब्ध पाण्यातून जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच प्रत्येक आवर्तनामधून शेतकरी व नागरिकांनी पाण्याची बचत करावी, असेही आवाहन त्यांनी केले.
उजनी प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे यासाठी जलसंपदा विभागाने कालव्यामध्ये झालेली झाडेझुडपे काढून टाकावीत. कालव्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे काढावीत. कालव्यातून प्रवाह व्यवस्थितपणे शेवटच्या टोकापर्यंत जाईल यासाठी कालव्याची दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत. तसेच कालव्या वरील ब्रिजची दुरुस्ती करून घ्यावी. आवश्यक त्या ठिकाणी नवीन ब्रिज करावेत. यासाठी विभागाने विशेष मोहीम राबवावी. तर जलसंपदा विभागाने भीमा नदीवर ११ बॅरेजेस प्रस्तावित केलेले आहेत तसा प्रस्ताव शासनाकडे आलेला असून या बॅरिजेसचे महत्व लक्षात घेऊन यातील जास्तीत जास्त बॅरेजेस मंजूर करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
मागील वर्षभरापूर्वी उजनी डावा कालव्यातील अति पाणी प्रवाहामुळे पाटकुल तालुका मोहोळ येथे कालवा फुटून ३३० शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व शेतीचे नुकसान झालेले होते त्या सर्व शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आदेश श्री. विखे पाटील यांनी दिले. उजनी प्रकल्पाच्या विविध कालव्याच्या अनुषंगाने नागरिक, शेतकरी व कालवा समितीच्या सदस्यांच्या काही तक्रारी, प्रश्न व मागणी असतील तर त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचा निपटारा करावा. मागील काही वर्षांपूर्वी उजनी धरणातून दहा ते पंधरा टीएमसी गाळ काढण्याचे टेंडर झालेले होते परंतु ते काही कारणामुळे रद्द झालेल्या आहे त्या अनुषंगाने समितीने अहवाल शासनाला सादर केलेला आहे तो अहवाल पाहून त्याविषयी पुढील काळात निर्णय घेऊ अशी माहिती त्यांनी दिली.
राज्याचे युवा कल्याण व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी प्रकल्पातून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाण्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून त्याची अंमलबजावणी ही करावी. उजनी धरणात पावसाचे पाणी जुलै ऑगस्ट या कालावधीत येते त्यामुळे सध्या उजनी धरणात असलेल्या पाण्याचे वाटप सर्वांना सम प्रमाणात करून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनानाही पुरेसे पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली.
प्रारंभी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण चे अधीक्षक अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव श्री. खांडेकर यांनी सादरीकरणद्वारे जलसंपदा विभागाने उजनी प्रकल्पाच्या पाण्याचे मे २०२५ अखेरपर्यंत केलेल्या सूक्ष्म नियोजनाची माहिती बैठकीत सादर केली. या मध्ये लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडे सिंचन व्यवस्थापनासाठी उजनी, सीना माढा उपसा सिंचन योजना, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव उपसा सिंचन योजना असे चार मोठे प्रकल्प, सात मध्यम प्रकल्प, ५७ लघु प्रकल्प व ९० कोल्हापूर बंधारे असल्याचे सांगून उजनी प्रकल्पात २ जानेवारी २०२५ रोजी उपयुक्त पाणीसाठा ५१.९२ टीएमसी (टक्केवारी ९६.९२), अचल पाणीसाठा ६३.६६ टी एम सी तर एकूण पाणीसाठा ११५.५८ टीएमसी असल्याचे सांगितले. तसेच कालव्यावरील आठमाही प्रकल्पीय पीक रचना, निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षातील पाणीपट्टी वसुली, खरीप हंगाम २०२४-२५ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, आकस्मिक पाणी आरक्षण, रब्बी हंगाम २०२४-२५ मधील प्रत्यक्ष पाणी वापर, रब्बी हंगाम २०२४-२५ मधील पूर पाणी वापर, रब्बी हंगाम २०२४-२५ चे प्रस्तावित पाणी नियोजन, उन्हाळा हंगाम पाणी नियोजन पाणीपुरवठा योजनेचे पाणी नियोजन आदीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ४ जानेवारी २०२५ रोजी उजनी प्रकल्पातून पहिले आवर्तन सोडण्यात येणारा असून दुसऱ्या आवर्तन एक मार्च व तिसऱ्या आवर्तन एक एप्रिल असे नियोजित असल्याचे श्री. खांडेकर यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी व अशासकीय सदस्यांनी बैठकीत मांडलेले विविध मुद्दे….
आमदार समाधान आवताडे यांनी मंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्याला या हंगामात पाण्याचे पाच आवर्तन सोडण्याची मागणी केली तसेच मागील दोन वर्षांपूर्वी पाण्याची पाच आवर्तने दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला व यावर्षीही पाच आवर्तने देण्याची मागणी केली. आमदार सुभाष देशमुख यांनी अभिनंदननाच्या अनुमोदन दिले व उजनी प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेण्या बरोबरच कालव्यातील झाडे झुडपे काढण्याची सूचना केली. खासदार प्रणिती शिंदे यांनी उजनी धरणातील शेतकऱ्यांना अजून पर्यंत मोबदला मिळाला नाही त्या अनुषंगाने स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी केली तर खासदार धैर्यशील पाटील यांनीही शेतकऱ्यांना उजनी धरणातून पावसाळ्यापर्यंत पाणी मिळेल यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी केली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील एकरूख पाणीपुरवठा योजनेत पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी सिंचन आराखड्यातील तरतुदीप्रमाणे सर्वांना सम प्रमाणात पाणी देण्याची मागणी केली.
करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्याला पुरेसे पाणी मिळावे तसेच उजनी प्रकल्पातून पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी उचल म्हणून करमाळा तालुक्याला उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विचार करावा असे सांगितले. आमदार अभिजीत पाटील यांनी सीना माढा सिंचन योजनेअंतर्गत माढा तालुक्यातील चार गावांना पाणीपुरवठा करावा यासाठी प्रकल्पातून फक्त ८०० मीटर पाईपलाईनची आवश्यकता असून ती पाईपलाईन टाकून द्यावी अशी मागणी केली. तर समितीचे अशासकीय सदस्य यांनी भीमा नदीला कालव्याचा दर्जा द्यावा कारण सोलापूर महापालिकेचे पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर भीमा नदी प्रवाही राहील या दृष्टीने विचार करावा अशी मागणी त्यांनी केली.
0000