सहकारातून विदर्भातील दुग्धोत्पादनाला चालना देणार – राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – महासंवाद

सहकारातून विदर्भातील दुग्धोत्पादनाला चालना देणार – राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – महासंवाद




नागपूर, दि. 25 :  पूर्वी कृषी विभागात समाविष्ट असलेल्या सहकार विभागाची आता स्वतंत्र निर्मिती करण्यात आली आहे.  या विभागाच्या माध्यमातून अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने  सहकार विभागाच्या माध्यमातून विदर्भातील दुग्धोत्पादनाला चालना देण्याची गरज आहे. यासाठी विशेष प्रयत्न सहकार चळवळीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज येथे सांगितले.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयाकडून ‘सहकार से समृध्दी’ या उपक्रमाअंतर्गत देशभरातील दहा हजार बहुउद्देशीय संस्थांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या नोंदणीकृत संस्थांचा आज शुभारंभ करण्यासाठी  नवी दिल्ली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथून करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला प्रादेशिक सहनिबंधक प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम वालदे यांच्यासह सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील सहकार चळवळीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या विभागाचा हा वारसा आपण सर्वांनी पुढे नेण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणात सहकारातून समृद्धी हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यावेळी म्हणाले.

या उपक्रमाच्या माध्यमातून सहकार चळवळ बळकट करणे, तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय लाभ पोहोचविले जाणार आणि सहकारी संस्थांची कार्यक्षमता, उत्पादकता आणि नफा वाढण्यास मदत होणार आहे. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणात हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून यासाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहकारातून समृद्धी या उपक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक सहकारी संस्था पारदर्शक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण आणि ग्रामीण सहकारी बँकांचे बळकटीकरण, सहकारी साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन, सहकारी संस्थांची क्षमता वाढवणे, व्यवसाय सुलभतेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर तसेच सहकाराशी संबंधित  इतर उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यातही सहकार चळवळीचे बळकटीकरण करण्याचाही आमचा प्रयत्न राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रवीण वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. लेंडे यांनी तर आभार नागपूर जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष राजेंद्र घाटे यांनी मानले.

0000







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here