लोकशाही बळकटीकरणसाठी उत्स्फूर्तपणे मतदान करा – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर – महासंवाद

लोकशाही बळकटीकरणसाठी उत्स्फूर्तपणे मतदान करा – अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर – महासंवाद

  • मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नव मतदारांना मतदान करण्याकरिता प्रेरित करण्यासाठी उपक्रम
  • मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम

सोलापूर. दि. ११ : भारतीय  लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. विशेषतः नव मतदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी आज येथे केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि नव मतदारांना मतदान करण्याकरिता प्रेरित करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वीप मल्टीमीडिया व्हॅनच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती ठाकूर बोलत होत्या.

यावेळी केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, शिक्षणाधिकारी कादर शेख, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ राजेंद्र वडजे, सरकारी कामगार अधिकारी विलास गायकवाड, समाज कल्याण अधिकारी सचिन कवले आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मागील विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण अल्प असलेल्या भागांमध्ये मल्टीमीडिया व्हॅनच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. ही व्हॅन सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील १०० हून अधिक ठिकाणी प्रवास करेल, ज्यात मतदानाचे प्रमाण अल्प असलेल्या भागांचा समावेश आहे. ही व्हॅन मतदान प्रक्रिया, मतदान केंद्राची ठिकाणे, आदर्श आचारसंहिता आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत तक्रारी दाखल करण्यासंबंधाची माहिती आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचे व्हिडिओ संदेश एलईडी स्क्रीनवर पाहता येणार आहे.मतदारांचा सहभाग वाढविणे आणि नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबद्दल साक्षर करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मतदान करण्याची शपथ दिली. शाहीर रमेश खाडे यांच्या पथकाने मतदान करण्याविषयी गाण्याच्या माध्यमातून सादरीकरण केले. यावर्षी प्रथमच मतदान करत असलेल्या भाग्यश्री अंकलगी आणि नागेश सोनसाखळे यांनी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत सर्वानी मतदान करावे, असे आवाहन केले. या नव मतदारांचा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी स्वीपचे सहायक नोडल अधिकारी रुपाली भावसार, गोदावरी राठोड, स्वाती स्वामी, अमोल भोसले, शाहबाज काजी, अनिल थोरबोले, साईराज राउळ, योगीराज कोंडाबत्तीन आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संगमेश्वर कॉलेज आणि वालचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here