विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा – महासंवाद

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा – महासंवाद

ठाणे,दि. २३ (जिमाका): निवडणूक प्रक्रिया पार पाडणे, हे टीम वर्क असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपासून ते मतदान केंद्रावरील प्रत्येक कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ही सर्वांनी गांभिर्याने व जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. राजेश  देशमुख यांनी आज झालेल्या बैठकीत सर्वांना दिले.

विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‍जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने तसेच सर्व जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते. तर  ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांपर्यत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी स्वीपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान जनजागृती कार्यक्रम राबवावेत. मतदानादिवशी मतदारांना मतदान केंद्रावर जास्त वेळ लागणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करावे. ज्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागतील तेथे मतदारांना बसण्यासाठी व्यवस्था करावी, यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रावर स्वत: भेटी देवून त्याचा आढावा घ्यावा. त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर मॉक पोल घेताना घ्यावयाची काळजी याबाबतच्या सर्व सूचना मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. तसेच मतदान केंद्रावर तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्याचे निवारण तातडीने करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. कोणत्याही परिस्थितीत कुठेही मतदान प्रक्रिया थांबणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी या बैठकीत दिले.

मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती मिळण्यासाठी क्यू आर कोडचा अवलंब करावा, जेणेकरुन मतदारांना मतदान केंद्रावर पोहचणे सोईचे होईल. तसेच मतदान केंद्रावर पाणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर, दिशादर्शक फलक, रॅम्प आदी सर्व सुविधा असणे आवश्यक असून त्याची पूर्तता करण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. तसेच मतदान केंद्रावर तसेच स्ट्राँग रुमच्या सुरक्षिततेबाबतचे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना पोलीस विभागाला देण्यात  आल्या.

मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी जे प्रशिक्षणाला उपस्थित नव्हते त्यांना नोटीस पाठवून त्यांचे पुन्हा प्रशिक्षण घेण्यात यावे. मतदान केंद्रावर कर्मचारी अपुरे पडणार नाहीत याबाबतही सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

विधानसभा निवडणुकांमध्ये ठाणे, मुंबई, पुणे या जिल्हयातील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पडतील, या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले.

बैठकीच्या सुरूवातीला ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी 18 विधानसभा मतदारसंघाची माहिती, ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या, मतदानासाठी तयार करण्यात आलेली मतदान केंद्रे,‍ मतदान प्रक्रियेसाठी लागणारी ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची संख्या, मतदान प्रक्रियेसाठी लागणारा कर्मचारी वर्ग आदींची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here