राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 नागपूर, दि. १९: राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून पहिल्या टप्प्यात 3 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात येतील. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाच्या अचूक माहितीसह, पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानाची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

नियम 97 अन्वये अवकाळी पाऊस व गारपीट यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अल्पकालीन चर्चा  उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. मुंडे बोलत होते.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, राज्यात नमो किसान महासन्मान योजनेतून सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना पहिल्या हफ्त्यापोटी 1720 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. यामधील निकषांमुळे पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी राज्यभर चार महिने विशेष मोहीम राबवण्यात आली. पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया द्यावा लागला तर दुसरीकडे आतापर्यंत सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना अग्रीम 25टक्केप्रमाणे 2216 कोटी रुपये रक्कम मंजूर करून त्यापैकी आतापर्यंत 1700 कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे वितरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित रकमेचे वितरण सुरू आहे. सहा जिल्ह्यातील विमा कंपन्यानी केंद्र सरकारकडे अपील केले असून, ती सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या सहा जिल्ह्यांचा विमा देखील अग्रीम प्रमाणे दिला जाईल. यावर्षी अग्रीम अंतर्गत देण्यात आलेली मदत ही मागील 5 वर्षातील रक्कमेच्या तुलनेत अनेक पटींनी असल्याचे त्यांनी सांगितले.

अवकाळी व गारपीटीचे अनुदान नवीन घोषणेप्रमाणे वाढीव दराने मंजूर करण्यात येत असून याअंतर्गत बाधित शेतकऱ्यांना सुमारे 1458 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे, त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण देखील सुरू केले आहे, असेही श्री. मुंडे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, फळपिक विमा यासह शासनाने लाभ दिलेल्या अन्य योजनांची देखील आकडेवारी विधानपरिषदेत दिली.

ड्रोन मिशन राबविणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे 

शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावेत यादृष्टीने राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबविण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठांमधून याबाबतचा स्वतंत्र पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असेही श्री मुंडे यांनी सांगितले.

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 20 हजार रुपयांची मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत करण्याची घोषणा श्री. मुंडे यांनी यावेळी केली. यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. 22 हजार ग्रामपंचायतीमध्ये वॉटर ग्रीड योजना आणणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचे जाहीर करुन ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’मध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ७६२ कोटी रुपये इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असल्याचे मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, सुरेश धस, प्रज्ञा सातव, नरेंद्र दराडे, अरुण लाड, अभिजीत वंजारी, अनिल परब, रमेश कराड, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला होता.

0000000

प्रवीण भुरके/ससं/

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here