उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिताबर्डी ते खापरी मेट्रो प्रवास

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिताबर्डी ते खापरी मेट्रो प्रवास

नागपूर दि. १६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी असा मेट्रो प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे व राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा व सूचना  प्रवाशांकडून जाणून घेतल्या. मेट्रो रेल्वेमुळे वेळेची व पैशाची बचत होत असल्याचे सुमित मोरे या परभणी येथून नागपुरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या प्रवाशाने सांगितले. इतर प्रवाशांनी देखील मेट्रो बाबत समाधानी असल्याचे सांगितल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाकडून मेट्रो रेल्वे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, त्यानुसार प्रवाशांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याचे तसेच स्वच्छतेची सवय लावण्याच्या सूचना श्री पवार यांनी मेट्रोरेल्वे प्रशासनाला केल्या. तत्पुर्वी त्यांनी सिताबर्डी इंटरचेंज स्थानकाची पाहणी केली तसेच येथील दुकानदारांच्या समस्या जाणून घेतल्या.

नागपूरच्या हिरवळीचे कौतुक

प्रवासादरम्यान रेल्वेतून दिसत असलेल्या शहरातील विविध स्थळांची माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी श्री. हर्डिकर यांचेकडून घेतली. नागपुरात सर्वत्र दिसत असलेल्या हिरवळीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

०००

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here