ठाणे, दि. १६ (जिमाका) : गेल्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत @2047 युवकांचा आवाज’ या थीमवर देशाला संबोधित केले. यासाठी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पना मांडाव्यात, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. एन.एल.दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चतर्फे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट बॅचच्या मीरा रोड येथील दीक्षांन्त समारंभात ते बोलत होते.
यावेळी आमदार गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, श्री.निरंजन लाल दालमिया, संस्थापक, एन.एल.दालमिया एज्युकेशनल सोसायटी, शिवकुमार दालमिया, अध्यक्ष, एन.एल. दालमिया एज्युकेशनल सोसायटी, शैलेश दालमिया, संस्थेचे मानद सचिव, मुदित दालमिया, उपाध्यक्ष, सोसायटीच्या सीईओ श्रीमती सीमा सैनी, डॉ. एम.ए. खान, संचालक, एन.एल. दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, डीन आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, तुमच्या आयुष्यातील या खास दिवशी तुमच्यामध्ये उपस्थित राहून खूप आनंद होत आहे. आज व्यवस्थापन पदव्या मिळवणाऱ्या सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. यावर्षी पदवीधर झालेले सर्व विद्यार्थी 2047 मध्ये त्यांच्या व्यावसायिक करिअरच्या शिखरावर असतील. नियतीने विद्यार्थ्यांना भारताला विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्रात बदलण्याची आणि त्यात योगदान देण्याची अनोखी संधी दिली आहे. जगातील अनेक देशांनी वेगवेगळ्या काळात विकसित राष्ट्र बनण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. हिरोशिमा-नागासाकी बॉम्बस्फोटानंतर जपान राखेतून उठून उत्पादनात अग्रगण्य देश बनला. दक्षिण कोरिया, चीन, सिंगापूर, मलेशिया आणि इतर देशांनी देखील परिवर्तनात्मक झेप घेतली आहे, ज्याने त्यांच्या विकासाच्या इतिहासाचा मार्ग बदलला आहे. आज आपल्यापैकी प्रत्येकाने परिवर्तनाच्या प्रवासात आपली भूमिका बजावायची वेळ आली आहे.
आमचे अनेक आयआयटीयन्स आणि व्यवस्थापन पदवीधर आकर्षक पॅकेजेसवर इतर देशात नोकऱ्या निवडत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात ब्रेन ड्रेन होत आहे. पण मी आशावादी आहे की, एक असा टप्पा येईल जेव्हा भारतात उलट स्थलांतर होईल. मला अशा दिवसाचे स्वप्न आहे जेव्हा आमचे व्यवस्थापन पदवीधर त्यांच्या स्वत:च्या जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन संस्था, सल्लागार कंपन्या तयार करतील. आपल्या देशाच्या स्वतःच्या कायदेशीर कंपन्या असतील, आपल्या स्वतःच्या ‘बिग फोर’ कर आकारणी आणि ऑडिट फर्म असतील.
चांद्रयान मिशन, सोलर मिशन आणि आशियाई खेळ आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या यशामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांच्यात ‘आपण करू शकतो’ अशी भावना निर्माण झाली आहे. तुम्ही ‘We Can’ ची ज्योत तुमच्या हृदयात ठेवावी आणि संपत्तीचे निर्माते आणि स्टार्टअप्सचे प्रवर्तक व्हावे, अशी इच्छा व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले की, मी तुम्हाला उद्योजक, नवोन्मेषक आणि जोखीम घेणारे बनण्याचे आवाहन करतो. Amazon, Flipkart आणि Swiggy या मुळात कल्पना होत्या, ज्या यशस्वीपणे प्रत्यक्षात आणल्या गेल्या. भारताने स्वत:चे जेफ बेझोस, जॅक मा, मार्क झुकरबर्ग यांची निर्मिती करण्याची वेळ आली आहे. कोणास ठाऊक, तुमच्यातही एखादा मार्क झुकरबर्ग दडलेला असेल, जो बाहेर येण्याची वाट पाहत असेल. भारत आज महानतेच्या शिखरावर आहे.
यावेळी विद्या शाखा सदस्य आणि कर्मचारी, अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी आणि सर्व टॉपर्स ऑनलाईन आणि ऑफलाईनही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपालांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांच्या हस्ते सर्व टॉपर्स विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
०००