अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारणार- उद्योग मंत्री उदय सामंत

अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारणार- उद्योग मंत्री उदय सामंत

अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारणार– उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर दि. 15 : पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने अकोला येथे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

या संदर्भातील प्रश्न सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना श्री. सामंत म्हणाले कीअकोला विकास केंद्र स्थापन करण्यासाठी ६६१.४३ हेक्टर आर संपादित जमिनीपैकी टेक्स्टाईल पार्कला शंभर  हेक्टर आर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये ५० आरेखित भूखंड वाटपास उपलब्ध असून त्याचे क्षेत्रफळ ४३.८३ हेक्टर आर आहे. या क्षेत्रामध्ये सामाईक सोयीसुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पुरविण्यात आल्या आहेत.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

——————-

नंदुरबार जिल्ह्यात स्थानिकांना प्राधान्याने रोजगार देणार– उद्योग मंत्री उदय सामंत

नागपूर दि.15 : नंदुरबार जिल्ह्यात स्थानिकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देऊन प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

नंदुरबार जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक क्षेत्र कार्यान्वित करण्याबाबतचा प्रश्न सदस्य आमश्या पाडवी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर, सत्यजित तांबे आदींनी सहभाग घेतला होता.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, भालेर औद्योगिक क्षेत्रात 285.58 हेक्टर आर क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकास कामे करण्यात आले असून एकूण 409 भूखंडाचे आरेखन केले आहे‌. त्यापैकी 55 भूखंडाचे वाटप झालेले आहे. एका भूखंडावर बांधकाम सुरू आहे‌‌. नवापूर औद्योगिक क्षेत्रात 64.19 हेक्टर आर क्षेत्रावर औद्योगिक  क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. यामध्ये 198 भूखंडाचे आरेखन करून 191 भूखंडाचे वाटप झालेले आहे. सात भूखंड शिल्लक आहेत 0.97 भूखंडावर टेक्स्टाईल उत्पादन सुरू आहे. यामध्ये सुमारे 1738 इतका स्थानिकांना रोजगार निर्माण झालेला आहे.

अतिरिक्त नवापूर औद्योगिक क्षेत्रात मे. जनरल पॉलिफिम्स प्रा.लि.(मेगा प्रोजेक्ट) यांच्याकडून 700 कोटी रुपयांची  गुंतवणूक करण्यात येत आहे. या उद्योगात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष एक हजार एवढा रोजगार निर्माण होणार आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

——————

म्हाडाच्या 56 वसाहतींचे वाढीव सेवा शुल्क माफ; मुंबईतील 50 हजार रहिवाशांना दिलासामंत्री अतुल सावे

नागपूर, दि.15 : म्हाडाच्या 56 वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन 1998 ते 2021 या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे सुमारे 380.41 कोटी रुपयांचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील 50  हजार सदनिकाधारांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

विधानपरिषदेत गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली. मंत्री श्री. सावे म्हणाले की, बृहन्मुंबईतील म्हाडाच्या 56 वसाहतीतील सन 1998 पासून वाढीव सेवा शुल्काचे दर लागू करण्यात आले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. सेवा शुल्कामध्ये वाढ करण्यासंबंधी अभ्यासगटही नियुक्ती करण्यात आला होता. या अभ्यासगटाने मुंबईतील म्हाडा वसाहतीतील रहिवाश्यांकडून जे सेवा शुल्क घेतले जाते, त्यातील म्हाडामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवांच्या शुल्काचे दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात यावेत, अशी शिफारस केली होती. त्यानुसार म्हाडाने त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्काचे दर 50 टक्क्यांनी कमी केले होते. मात्र,  मुंबई महानगरपालिका, बेस्ट यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या सेवांचे शुल्क कमी केले नव्हते. त्यामुळे म्हाडाला सन १९९८ ते २०२१ या कालावधी मध्ये 472 कोटी रुपयांची तूट निर्माण झाली होती. थकीत सेवा शुल्काबाबत म्हाडाने सन १९९८ ते २०२१ या कालावधीच्या सुधारित सेवा शुल्काबाबत अभय योजना लागू केली होती. या अभय योजनेला रहिवाश्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. सेवा शुल्क वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा बोजा सहन करावा लागत होता.

14 मे, 2023 रोजी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेमध्ये म्हाडाच्या बृहन्मुंबई मधील ५६ वसाहतीतील सस्थांकडील सन 1998-2021 या कालावधीमधील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी घोषित केले होते. सेवा शुल्क माफ करण्यासाठी आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड व मुंबईतील सर्व आमदारांनी सतत पाठपुरावा केला. त्यांची मागणी या निर्णयामुळे पूर्ण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीतील निर्देशानुसार हा निर्णय घेतल्याची माहिती, मंत्री श्री. सावे यांनी दिली.

००००

राजू धोत्रे/विसंअ

—————-

राज्यातील शासकीय रुग्णालयांत पुरेसा औषधसाठा– मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर दि.15 : नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तसेच कळवा जि. ठाणे येथील शासकीय रुग्णालयात नुकत्याच घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली.

नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय रुग्णालयांतील मृत्यूकरिता जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील घटना दुर्दैवी होत्या. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी सरकार घेईल. राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक महिन्यात अधिष्ठातांकडून रुग्णालयांची व उपलब्ध औषध साठ्याची माहिती घेऊ, कुठे औषधे कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. रुग्णालयांची पदभरती प्रक्रिया सुरू आहे. शासकीय रुग्णालयातील घटना प्रकरणी संचालनालयामार्फत केलेल्या चौकशीत आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्याची कार्यवाही चालू आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

———————–

राज्यात आवश्यक तेथे ट्रॉमा केअर सेंटर उभारणार– मंत्री प्रा. डॉ. मंत्री तानाजी सावंत

नागपूर दि.15 : अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित उच्च दर्जाचे उपचार आणि वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता राज्यात आवश्यक त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील 45 ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री.सावंत बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, सत्यजित तांबे, मनीषा कायंदे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

यावेळी मंत्री श्री. सावंत म्हणाले की, राज्यातील 45 अकार्यान्वित  ट्रॉमा केअर युनिट पैकी 17 चे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित 28 ट्रॉमा केअर युनिट कार्यान्वित करण्याची कार्यवाही वेगवेगळ्यास्तरावर सुरू आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या सतरा पैकी पंधरा ट्रॉमा केअर युनिटची पद निर्मिती झालेली आहे. यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाकडे सुरू आहे. या ट्रॉमा केअर युनिटसाठी  वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच गट ‘क’ व ‘ड’ पदभरतीची  जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवाराची परीक्षा घेण्याची प्रक्रिया टीसीएस या कंपनीमार्फत सुरू आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

———————

नागपूर शासकीय दंत रुग्णालयांमधील ऑनलाइन सेवा सुरू  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

नागपूर दि.15 : नागपूरसह राज्यातील वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयांमध्ये शासनाने 11 जुलै 23 रोजीच्या आदेशान्वये रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली ही ऑनलाइन सेवा सुरू करण्यास मान्यता प्रदान केली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिली.

नागपूर शासकीय दंत रुग्णालयांमधील ऑनलाइन सेवा सुरू करण्याबाबतचा प्रश्न सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, नागपूर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात ऑनलाइन सेवा सुरू करून बंद पडलेल्या सोयीसुविधांसाठी गव्हर्न्मेट मार्केट प्लेस अर्थात जेम (GeM) पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया लवकरच आयुक्तस्तरावरून राबविण्यात येत आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

————————-

अहमदनगर जिल्ह्यातील भानगाव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर– मंत्री गुलाबराव पाटील

नागपूर दि.15 : जल जीवन मिशन अंतर्गत भानगाव (ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) येथील नळ  पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीत असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

भानगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील नळ  पाणीपुरवठा योजनेचे काम प्रलंबित असल्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री पाटील म्हणाले की, जलजीवन मिशन अंतर्गत भानगाव योजनेचे उर्ध्व वाहिनीचे व वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण असून उंच टाकीचे पहिल्या टप्प्यापर्यंत काम पूर्ण झालेले आहे. योजनेचे काम प्रगतीत आहे. सद्यःस्थितीत भानगाव गावठाण व तीन वाड्या वस्त्यांना  अस्तित्वातील योजनेव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

—————

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here