नागपुरात होणार विस्तारित विभागीय क्रीडा संकुल – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

नागपुरात होणार विस्तारित विभागीय क्रीडा संकुल – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

नागपूर, दि.१४ : विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विभागातील खेळाडू घडावेत, त्यांना विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीसुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात यासाठी दक्षिण –पश्चिम नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने विस्तारित विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे सांगितले.

विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल आणि नागपूर जिल्ह्यातील विविध क्रीडाविषयक बाबींची आढावा बैठक पार पडली.  बैठकीला विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, युवक व क्रीडा महासंचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, उपसचिव सुनील हंजे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व माजी आमदार सुधाकर कोहळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोराडी येथे अत्याधुनिक तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येत असून, त्याचे बांधकाम मानंकांनुसार होत नसल्याच्या बाबी निदर्शनास येत असून, येथील बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही कमतरता राहता कामा नये, चांगल्या सोयीसुविधा मिळाल्यास नागपूर विभागातून अजूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशाचा नावलौकीक कमवतील, असा विश्वास क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केला.

तालुका क्रीडा संकुलाचे काम वेगाने पूर्ण करून ते खेळाडूंना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगून, विभागीय क्रीडा संकुलामध्ये ज्या क्रीडा प्रकारांचे कोर्ट, हॉल, यासह विविध सोयीसुविधा नाहीत, त्या विस्तारित क्रीडा संकुलात उभारण्यात येतील. तसे प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश संबंधित विभागाला त्यांनी दिले.

तालुकास्तर लक्ष्यवेध लीग क्रीडा स्पर्धेसाठी 10 लाख रुपयांचा निधी देण्याबाबत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणी केली. नागपूर जिल्ह्यातील विविध क्रीडाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत गादा येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी विशेष बाब म्हणून अतिरिक्त निधी  उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार श्री. बावनकुळे यांनी केली. तसेच नागपूर हे मेट्रो शहर असल्यामुळे त्याचा वाढता विकास आणि लोकसंख्येचा विचार करता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत सुविधायुक्त असे क्रीडा संकुल उभारण्यात येईल, त्यासाठी जयप्रकाशनगर येथील जागेची पाहणी करण्यात आली असून, त्याचा प्रस्तावही पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय क्रीडा संकुलात सुविधांचा सुधारित आराखडा आणि अंदाजपत्रकाबाबतही क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांनी आढावा घेतला. तसेच नरखेड, रामटेक आणि उमरेड येथील तालुका क्रीडा अधिकारी यांच्या नियुक्ती शिवाय नागपूर ग्रामीण आणि भिवापूर येथील जागेचे समपातळीकरण करण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. तसेच विभागीय क्रीडा संकुलात अद्ययावत स्पोटर्स सायन्स सेंटरची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा विभागाच्या प्रलंबित मागण्यांबाबतही सकारात्मकतेने चर्चा

क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली मानकापूर येथे पार पडलेल्या  आढावा बैठकीत दिपाली विजय सबाने, सोनाली चिरकुटराव मोकासे, मृणाली प्रकाश पांडे, रोशनी प्रकाश निरके आणि संदीप नारायणराव गवई यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली असून, शासन निर्णयानुसार गुणवत्ताधारक दिव्यांग खेळाडूंना शासन सेवेत लवकरच घेण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही क्रीडामंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

पॅरा आर्चर छत्रपती पुरस्कार विजेते संदीप गवई यांच्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने सुमोटो प्रकरण दाखल करून घेतले असून, त्यांनी दिलेल्या निर्णयावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचाही आढावा त्यांनी घेतला. आयसीसी महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत उपविजेत्या संघातील राज्यातील तीन खेळाडूंना रोख रक्कम प्रदान करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश क्रीडामंत्र्यांनी संबंधितांना दिले.  तसेच राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनापोटी प्रतिव्यक्ती आता 480 रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याप्रमाणे निवास व जेवणासाठी निधी प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह इतरही विषयांवर मंत्री श्री. बनसोडे यांनी चर्चा केली.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here