संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न करावा – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न करावा – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

 नागपूर दि. 13 : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी भारतीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी तयार केलेले संशोधन व्यावसायिक पातळीवर उपयोगात आणावे तसेच संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.

पुणे येथे‍ होणाऱ्या 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या नियोजनासाठी रविनगर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही प्रदर्शनी श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे.

शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, सहसचिव इम्तियाज काझी, उपसचिव समीर सावंत, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक प्रा. दिनेश प्रसाद सकलानी, प्रा. सुनिता फरक्या, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) संचालक कृष्णकुमार पाटील, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण उपसंचालक डॉ. राधा अतकरी, तेजस्विनी आळवेकर तसेच विज्ञान विभाग प्रमुख, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. अमोल येडगे यांनी महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी 2023 बाबत केलेल्या तयारीबाबत यावेळी सादरीकरण केले.

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या आयोजनाचा मान यंदा महाराष्ट्राला मिळाला असून ही बाब महाराष्ट्राची शान वाढविणारी आहे असे सांगून श्री. केसरकर म्हणाले की, प्रदर्शनामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी आणि त्यांनी सादर केलेले प्रयोग यांचा डेटाबेस तयार करावा व पुढील काळात त्या विद्यार्थ्यांचे ट्रँकिंग करावे.  त्यांच्या पुढील संशोधन क्षेत्रात त्यांना सहकार्य करावे. तसेच पेटंट कार्यालयाशी संपर्क साधून या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आमंत्रित करावे. विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधन क्षेत्रात संधी मिळेल, त्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळून मूर्त स्वरुप मिळेल, यासाठी प्रयत्न करावे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी विविध उद्योग, व्यावसायिक तसेच कौशल्य विकास विभाग यांच्याशी संपर्क साधावा. पुण्यातील डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेलाही या प्रदर्शनात सहभागी करुन घ्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.

श्री. केसरकर पुढे म्हणाले की, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होतील, यासाठी नियोजन करावे. तसेच जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पहिले तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात सहभागी करुन घ्यावे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य यांना दूरदृष्यप्रणालीद्वारे याबाबत सूचना देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राकडे यंदाच्या 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2023 चे यजमान पद आलेले आहे. हे प्रदर्शन 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन 26 डिसेंबरला होणार असून 30 डिसेंबर रोजी समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 31 डिसेंबर रोजी प्रदर्शनाला उपस्थित विद्यार्थ्यांची सहल आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमाच्या माध्यमातून 14 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी संधी मिळते. या प्रदर्शनीमध्ये अंदाजे 600 विद्यार्थी सहभागी होणार असून 225 स्टॉल्स लागणार आहेत . एनसीईआरटीच्या प्रा.सुनिता फरक्या यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना प्रदर्शनाबाबत यावेळी सविस्तर माहिती दिली.  नागपूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण  संस्थेच्या प्राचार्य डॉ. हर्षलता बुराडे यांनी आभार मानले.

00000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here