श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी बंधूभावाने रहावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी बंधूभावाने रहावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि. 10 (जिमाका): उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आमदार रवी राणा यांनी आयोजित केलेल्या नवाथे चौक येथील दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी बंधूभावाने रहावे. सर्व जात, पात, धर्म विसरुन दहीहंडीतील प्रेमाचा गोपालकाला एकमेकांना वाटून समाजात सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी आज येथे केले.

नवाथे चौक येथे आयोजित भव्य दहीहंडी कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह सिनेकलाकार शिल्पा शेट्टी, राजपाल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. फडणवीस यांनी मंचावरील दहीहंडी श्रीफळाने फोडून कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला. छत्री तलाव येथे श्री हनुमानजी यांची १११ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. श्री. फडणवीस यांच्या हस्ते  त्या  मूर्तीच्या प्रतिकृतीचे रिमोटव्दारे अनावरण करण्यात आले. हनुमान चालिसाचेही यावेळी पठण करण्यात आले. तसेच तिवसा व राऊर येथील निराधार कुटुंबांना घरकूल मंजूर झाले आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात घरकुलाचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात आला .

श्री. फडणवीस म्हणाले, श्रीकृष्ण आणि अमरावतीचा प्राचीन काळापासूनचा संबंध आहे. श्रीकृष्ण हे अमरावतीचे जावई आहेत. श्रीकृष्णाच्या विचारसरणीप्रमाणे सर्व समाजबांधवांनी एकोप्याने रहावे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, अमरावती विमानतळाचा विकास करण्यात येणार आहे. तसेच येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. पीएम टेक्सटाईल पार्क अंतर्गत नव्या टेक्सटाईल पार्कची निर्मिती करण्यात येणार असून यातून 3 लक्ष तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. मराठी भाषेचे गौरवस्थळ मानल्या जाणाऱ्या रिद्धपूर (जि. अमरावती) येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय अर्थसंकल्पाद्वारे झाला आहे. अमरावती येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्था, तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाचवेळी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ आणि दोन मोठ्या संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणे ही घटना अमरावतीच्या शिक्षणपरंपरेला दृढ करणारी आहे. तसेच अमरावतीचे श्रध्दास्थान तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे स्मारक तयार करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी या निर्णयांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा तसेच सिनेकलाकार शिल्पा शेट्टी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

***

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here