ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार – ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो.मार्गारेट गार्डनर

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार – ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो.मार्गारेट गार्डनर

मुंबई, दि. 6 : भारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी मेलबर्न राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात येतात. आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे देखील लवकरच भारतात आपले कॅम्पस सुरु करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी दिली.

गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी व्हिक्टोरिया राज्याच्या एका शिष्टमंडळासह बुधवारी (दि. ६) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात भारतीय लोकांची संख्या मोठी असून ते तेथील नागरी सेवा, संस्कृती व उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे गार्डनर यांनी सांगितले.  मेलबर्न येथे महाराष्ट्रातील लोकांची सांस्कृतिक संघटना असून मुंबई – मेलबर्न थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्र व व्हिक्टोरिया राज्यातील संबंध अधिक व्यापक होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देशांना जोडणारा क्रिकेट हा धागा वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुआयामी आहे. मेलबर्न येथे भारतीय चित्रपटांचा देशाबाहेरील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऑस्ट्रेलियातील विद्यार्थी पूर्वी इंग्लंड अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जात असत, परंतु आज अनेक विद्यार्थी भारतात टाटा समाज विज्ञान संस्था, आयआयटी येथे विद्यार्थी आदान – प्रदान कार्यक्रमांतर्गत येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि व्हिक्टोरिया राज्यात आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आल्याबद्दल व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर यांचे स्वागत करताना राज्यपालांनी त्यांना राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून आपण राज्यातील २६ विद्यापीठांचे कुलपती आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भारताला  सन २०३५ पर्यंत सकल विद्यार्थी नोंदणीचे प्रमाण ५० टक्के इतके गाठावयाचे आहे. एक युवा राष्ट्र म्हणून भारताला ऑस्ट्रेलियाकडून कौशल्य शिक्षणात देखील सहकार्य अपेक्षित असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  मुंबई – मेलबर्न थेट विमानसेवेमुळे व्यापार, परस्पर संबंध तसेच पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतील वाणिज्यदूत मॅजेल हिंड, व्हिक्टोरिया गव्हर्नर यांचे सचिव जॉनाथन पॅट्रिक बुर्के, व्हिक्टोरिया राज्याच्या दक्षिण आशिया कमिशनर मिशेल वेड, रॉबर्ट हॉलंड, विद्यानंद सागराम व गरिमा शेवकानी आदी उपस्थित होते.

००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here