भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम

मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजी पार्क येथे माहिती व प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या माहिती स्टॉलचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व विविध महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या माहिती स्टॉलमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध महामंडळे कार्यरत आहेत. या महामंडळाच्या योजनांची माहिती पुस्तिकाही मोफत वाटप करण्यात येत आहे.

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी भोजन स्टॉल उभारण्यात आला असून या स्टॉलवर भोजनाचा एक बॉक्स व एक पाणी बॉटल याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने पुस्तक स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या पुस्तक स्टॉलवर बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी पुस्तके उपलब्ध आहेत. या माहिती व प्रसिद्धी स्टॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यासारख्या महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके उपलब्ध आहेत. या सर्व पुस्तकांवर ८५% इतकी सूट देण्यात आलेली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती व प्रसिद्धी स्टॉलला व मोफत भोजन स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here