चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलासाठी ५७ कोटी निधी मंजूर

चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुलासाठी ५७ कोटी निधी मंजूर

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे खेळाडूंना मोठा दिलासा

  • चंद्रपूरचे खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 14 : जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी  5718.30 लक्ष रुपये  निधी मंजूर झाला आहे. शहरात सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या यादीत राज्य शासनाच्या या निर्णयामुळे भर पडली असून क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत   महत्त्वाचा मानला जात असून विविध क्रीडा संघटनांनी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, क्रीडामंत्री तसेच शासनाचे आभार मानले आहेत. यापूर्वी या संकुलाकरीता 20 कोटी रुपये खर्च झाले असून 7718.20 लक्ष रुपयांची सुधारीत मान्यता प्रदान करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

मैदानी खेळात चंद्रपूरचे युवक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले पाहिजे, त्यांना यश मिळाले पाहिजे यासाठी त्यांना क्रीडानुकूल वातावरण मिळावे म्हणूनच पालकमंत्री म्हणून मी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. राज्य सरकारने याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी मागणीची दखल घेत सुमारे 57 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशा भावना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या आहेत.  त्यांनी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांचे आभार मानले आहेत.

जिल्हा क्रीडा संकुल सुसज्ज असावे आणि खेळाडूंना दर्जेदार सुविधा प्राप्त व्हाव्यात, अशी मागणी खेळाडूंनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. श्री. मुनगंटीवार यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. चंद्रपूर या आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये अनेक गुणी खेळाडू आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि सरावासाठी सुसज्ज मैदान उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भावनेतूनच जिल्ह्यातील आदिवासी व इतर सर्व तरुणांना क्रीडा क्षेत्रात उंच भरारी घेता यावी म्हणून माझा प्रयत्न सुरु आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश मिशन ऑलम्पिक 2036 ची तयारी करत असताना, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेची जबाबदारी चंद्रपूरवर सोपविण्यात आली ही अतिशय अभिमानाची बाब आहे . याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही जिल्हा क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी जाहीर केलेला निधी हा खेळाडूंचे मनोबल उंचाविणारा आहे, अशी प्रतिक्रियाही ना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

सदर क्रीडा संकुलामध्ये प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, ड्रेनेजसह मुला-मुलींचे वसतिगृह, फर्निचर, मल्टीपर्पज इंडोअर गेम बिल्डिंग, बास्केटबॉल, टेनिससह सर्वच खेळांची सोय, प्रशासकीय इमारत, प्रेक्षक गॅलरी, कोचेस रूमसह जलतरण तलाव, जिम्नेशियम साहित्य, उत्तम शिल्पकला इत्यादींची निर्मिती होणार आहे.

याशिवाय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन यापूर्वीच विकासकामांचा धडाका लावून आणलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. ज्यामध्ये मिशन शौर्य अंतर्गत चंद्रपूरसह विदर्भाचा अभिमान ठरलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन;  त्यामुळे देशात वाढलेला चंद्रपूरचा गौरव याचे श्रेय सुधीर मुनगंटीवार यांचेच आहे.

या सोबतच प्रामुख्याने देशाचा मानबिंदू असलेली वन अकादमी,  देशाच्या संरक्षणासाठी लढणारे वीर जवान घडविण्यासाठी देशाचा वैभव वाढविणारी सैनिक शाळा, बल्लारपूर येथील सुसज्ज क्रीडा संकुल, आंतरराराष्ट्रीय दर्जाचा स्मार्ट  सिंथेटीक ट्रॅक, मूल येथील कृषी महाविद्यालय, मूल, पोंभुर्णा येथील क्रीडा संकुल, चंद्रपूर शहरातील सर्व सुविधायुक्त बॅडमिंटन हॉल,  बांबू संशोधन केंद्र,  शहरातील आकर्षक रामसेतू, बाबुपेठ येथील उड्डाणपूल या आणि अशा अनेकविध कामांमुळे  ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहराला प्रगतीच्या वेगळ्या उंचीवर स्थान प्राप्त करून दिले आहे.

00000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here