उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी विकासकामांना गती देण्याचे निर्देश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी विकासकामांना गती देण्याचे निर्देश

बारामती, दि. २६ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  बारामती परिसरातील नागरिकांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करून ही कामे गतीने व दर्जेदार करण्याचे निर्देश दिले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभाग, गरुड बाग, जवाहरबाग, श्रीमंत बाबुजीनाईक वाडा, कऱ्हा नदी सुशोभीकरण, पाटस रोडवरील जलतरण तलाव आणि बाल विकास मंदिर शेजारील विकास कामांची पाहणी  करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली.

कऱ्हा नदीचे सुशोभिकरण करीत असताना जीर्ण झालेल्या संरक्षण भिंती नव्याने उभारण्याची कार्यवाही करा. नदीच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करावे. नदीतील पाण्याचे वहन होत असताना अडथळा निर्माण होणार नाही, पुराच्या वेळी पाण्याच्या अधिकाधिक प्रवाह होईल, या परिसरात स्वच्छता राहील, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

कन्हेरी वनविभाग परिसरातील विकास कामे करीत असताना हवामानानुरुप वाढणारी, कमी प्रमाणात पानगळ होणाऱ्या विविध प्रजातीचे वृक्षारोपण करा. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेदृष्टीने विचार करुन पायऱ्या व बैठक व्यवस्था करा. सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध ठिकाणी जाळ्या लावाव्यात. विकासकामे करतांना निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

गरुड बाग, जवाहरबाग, बाल विकास मंदीर शेजारील विकासकामे करताना पदपथावर स्वच्छता राहील, याची काळजी घ्यावी. व्यवसायिकदृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या दुकानांच्या गाळ्याचे काम मजबूत होईल, याची दक्षता घ्या. नागरिकांना रात्रीच्या वेळी फिरताना स्पष्ट दिसेल, अडथळा निर्माण होणार नाही, याचा विचार करुन वीजेचे खांब बसवावे. सुशोभिकरण अंतर्गत लावण्यात येणाऱ्या पदपथाच्या बाजूला लावण्यात येणाऱ्या फुलझाडांच्या रंगानुसार परिसराची रंगरंगोटी करावी. नटराज मंदीर येथील कार्यक्रम झाल्यानंतर परिसरात स्वच्छता राहील, याची दक्षता घ्यावी, असेही श्री.पवार म्हणाले.

श्रीमंत बाबुनाईक वाडा परिसर विकासकामे करतांना जुन्या बारामतीकडून नव्या बारामती दरम्यान तालुक्यातील ऐतिहासिक वास्तुंची विविध छायाचित्रे लावावी. प्रकाशाच्या उजेडामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही, अशा एलईडी दिव्यांची निवड करा. शौचालय बांधकाम करताना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या सुविधांचाही विचार करण्यात यावा. पाटस रोडवरील जलतरण तलाव व मुख्य रस्त्यामध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जाळ्या लावाव्यात. तलाव व परिसर स्वच्छ ठेवा,  असेही ते म्हणाले.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील आदी उपस्थित होते.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here