भगवान बिरसा मुंडा जोडरस्ता योजनेतून आदिवासी पाडे बारमाही जोडली जाणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

भगवान बिरसा मुंडा जोडरस्ता योजनेतून आदिवासी पाडे बारमाही जोडली जाणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

धुळे : दिनांक 11 (जिमाका वृत्त);  भगवान बिरसा मुंडा जोडरस्ता योजनेच्या माध्यमातून आदिवासी जिल्ह्यातील आतापर्यंत वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनापासून दूर राहिलेले पाडे, वस्त्या, बारमाही जोडरस्त्यांनी जोडली जाणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

साक्री तालुक्यातील उंबरखडवा येथे अर्जुनसागर ॲग्रो प्रोड्‌युसर कंपनी मार्फत आयोजित बचत गट व भेव्य शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमात डॉ. गावित बोलत होते. या कार्यक्रमास खासदार डॉ.हिना गावित, जि.प.सदस्या सुमित्रा गांगुर्डे, खंडु कुवर, विश्वनाथ बागुल,पंचायत समिती कृषी अधिकारी रमेश नेतनराव,सरपंच संदीप चौरे, हिना बोरसे, गोटू माळाचे, मधुकर भदाणे, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, इजिनिंअर मोहन सुर्यवंशी, विक्की कोकणी, चंद्रकांत पाटील, के.टी.सुर्यवंशी, माजी सदस्य मधुकर बागुल, माजी पं.स.सदस्य राजेंद्र सताळे,भिका जगताप अर्जुनसागर ॲग्रो प्रो.कंपनीचे अध्यक्ष पिंटु अहिरे, यांच्यासह सरपंच, उपसरपंच, विविध सोसायटीचे चेअरमन, महिला बचत गटाचे अध्यक्ष, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, राज्यातील सर्व आदिवासी वाडे, पाडे, गावे रस्त्याने जोडण्यासाठी शासनाने भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळा, अंगणवाडी, सरकारी संस्था, तसेच ज्या गावाला वाड्याला पाड्याला अद्याप रस्ते नाही अशा ठिकाणी रस्ते तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या दोन वर्षात सर्व गाव, पाड‌्यातील रस्ते तयार करण्यात येणार असून हे रस्ते कमीत कमी पाच वर्षे चांगले टिकतील असे दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.  केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून येत्या काळात ज्या भागात वीज पुरवठा, नवीन रोहित्र बसविणे, नवीन सबस्टेशन करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या भागातील शेतीला बारमाही पाणी देण्यासाठी या भागातील जेवढे नदी, नाले आहेत त्यावर साखळी बंधारे कसे बांधता येईल याचा सर्व्हे करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहे. यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

प्रत्येकाच्या शेतात पाणी पोहचविण्याचे शासनाचे नियोजन असून येत्या काळात वरच्या भागात उपसा सिंचन योजना तयार करुन या भागातील शेतीसाठी प्रत्येकांच्या शेतात पाणी पोहचून शेतीचे उत्पन वाढविण्याचे प्रयत्न केले जाईल. पाणी उपलब्ध झाल्यावर येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून शेडनेट, पॉली हाऊसचा लाभ घ्यावा. गतवर्षी 275 शेडनेट साक्री, शिरपूर व नंदुरबार तालुक्यात देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेडनेटच्या माध्यमातून अधिक चांगले उत्पन्न घेवून शेतकऱ्यांना आपली आर्थिक परिस्थिती सुधारता येईल यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

येत्या काळात 2 हजार महिला बचतगटांना विविध प्रकारच्या भाजीपाला पिकावर प्रक्रिया करुन ते सुकविण्यासाठी सोलर यंत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोलर यंत्राच्या माध्यमातून वेगवेगळया प्रकारचा भाजीपाला सुकवून प्रक्रियायुक्त पदार्थ आदिवासी विकास विभाग खरेदी करणार आहे. तसेच कापुस, मका, तुर यांच्या टाकाऊ काड्यांपासून टोकळे तयार करण्याचे मशीन देणार असून ते टोकळेही आदिवासी विकास विभागामार्फत खरेदी करण्यात येईल. ज्या नागरिकांकडे घरे नाहीत आणि ‘ड’ यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरिकांना शबरी आवास योजनेतंर्गत प्रत्येकाला 100 टक्के घरकुल देण्यात येईल.

घरकुल योजनेंतर्गत एका कुटुंबाला एकच घर मिळत असल्याने विभक्त कुटुंबाने आपले विभक्त कुटुंब म्हणून नोंदणी करावी. चांगले शिक्षण देण्यासाठी नवीन आश्रमशाळा उभारण्यात येत असून प्रत्येक आश्रमशाळेत डिजिटल लायब्ररी सुरु केली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धींगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी व विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व्हावी व विकसित व्हावी ह्या हेतूने शिक्षकांची क्षमता परीक्षा घेण्यात येत असल्याचे असल्याचे मंत्री डॉ.गावित यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की, साक्री तालुक्यातील संपूर्ण आदिवासी क्षेत्रात बारमाही जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा नव्हती. या भागातील रस्ते अधिकाधिक चांगले कसे होतील यासाठी वेळोवेळी केंद्र शासनाकडे व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. पाठपुराव्यातून येथील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाल्यावर येथील भागात रस्ते तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विकास मंत्री डॉ.गावित यांनी या भागातील बऱ्याच ग्रामपंचायतींना नवीन रस्ते व जुने रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. साक्री तालुका हा भौगोलिकदृष्टया खुप मोठा असल्याने या साक्री पट्ट्यात रस्त्याची लांबी जास्त असल्याने डॉ.गावित यांनी रस्ते दुरुस्तीसाठी जवळपास 50 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहे. त्या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. तसेच येत्या काळात साक्री तालुक्यातील एकही पाडा, गाव रस्त्यापासून वंचित राहणार नाही यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी अधिक निधीची मागणी केली आहे. चौपाळे गटासाठी विविध विकास निधीतून जवळपास 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवराच्या हस्ते रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन रामलाल जगताप यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने बचत गटाचे प्रतिनिधी, शेतकरी, नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

00000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here