एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’

एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’

जळगाव,‌दि.१ नोव्हेंबर (जिमाका) – आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. राज्यातला अशा प्रकारचा पुस्तकांचा एकमेव बगीचा आहे हे विशेष !

आपण विविध प्रकारचे गार्डन पाहता, मात्र एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

 

३३ गुठ्यांत साकारणार पुस्तक बगीचा

शहरातील आनंद नगर भागात 33 गुंठे  म्हणजेच बीघा भर जागेत पुस्तकांचा बगीचा साकारला जातो आहे. या नाविन्यपूर्ण गार्डनमधे विविध प्रकारचे पुस्तक उपलब्ध असणार आहेत. ठिकठिकाणी पुस्तकांचे बाॅक्स आहेत.  पुस्तक वाचनासाठी आठ वाचन कट्टे बांधले आहेत. बगीच्यात पूर्णत: निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. गार्डनमध्ये प्रत्येक मोठ्या झाडाखाली पुस्तकाचे बॉक्स आहेत. तेथून पुस्तक काढून तुम्हांला ते झाडाखाली बांधण्यात आलेल्या ओट्यावर बसून वाचता येणार आहे.

बगीच्यात सर्वकाही

या पुस्तकांच्या बगीच्यात ग्रीन लॉन व विविध सुगंधीत फुलझाड आहेत. त्यातून वातावरण सुगंधीमय होणार आहे. भिंतीवर विचारवंताचे पुस्तकात व्यक्त केलेले विचार चित्रीत करण्यात आले आहेत. तर ठिकठिकाणी कवितांचे पोर्ट्रेट करण्यात आले आहे. ग्रीन जीमची ही व्यवस्था करण्यात आली आहे. पुस्तक व वृक्ष यावर आधारीत भितीचित्र रंगविण्यात आले आहे. कवयित्री बहीणाबाईच्या कवितेसह पुस्तकांचे भव्य शिल्प उभारण्यात आले आहे. याबरोबरच पुस्तक प्रेमी वाचक प्रतीत करणारे पुतळे करण्यात आले आहेत.

ज्येष्ठांसाठी विशेष सोयी

म्हातारपणात माणसं ही बगीच्यातच अधिक रमतात. त्यादृष्टीने पालिकेने नाना-नानी पार्क ची व्यवस्था करण्यात आली आहे. या गार्डन मध्ये लहानपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या गरजा लक्षात घेण्यात आल्या आहेत हे विशेष. कथा, कादंबरी, विविध चरित्र, कवितासंग्रह, विविध स्पर्धा परीक्षांचे पुस्तक येथे उपलब्ध असणार आहे. याबरोबरच पुस्तकाचे सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला आहे.

राज्यातला पहिलाच प्रयोग

एरंडोल नगरपरीषदेने साकारलेला पुस्तकांचा बगीचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. हा नाविन्यपूर्ण बगीचा निश्चितच वाचन संस्कृती व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या बागेची रचना ही सगळ्याच घटकांचा विचार करून करण्यात आली आहे. हा बगीचा राज्यासाठी आदर्श ठरणार आहे हे निश्चित! एरंडोल वासीयांसाठी हे गार्डन पर्वणीच ठरणार आहे.

“शहरातील नागरीकांमध्ये वाचन संस्कृती वृध्दिंगत व्हावी या उद्देशाने या पुस्तक बागेची निर्मिती करण्यात येत आहे. लहानांपासून वृध्दांपर्यंत सर्व जण पुस्तक वाचन करू शकतील अशी पुस्तक व व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच हा बगीचा नागरिकांसाठी खुला होणार आहे” – विकास नवाळे, मुख्याधिकारी एरंडोल नगरपरीषद

०००००००००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here