पालकमंत्र्यांनी घेतला योजनेच्या प्रगतीचा आढावा
यवतमाळ, दि.२८ (जिमाका) : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेची कामे युद्धस्तरावर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पालकमंत्री संजय राठोड यांनी या योजनेच्या प्रगतीचा आढावा दारव्हा येथील विश्रामगृहात घेतला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता अश्विन चव्हाण, तहसिलदार विठ्ठल कुमरे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, मजीप्राचे उपअभियंता सुनील चव्हाण आदींसह रेल्वे, महावितरण, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सद्या दारव्हावासियांना पाच-सात दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांना पाणी पोहोचले पाहिजेत. या पाणी पुरवठा योजनेचे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष ठेवून तातडीने कामांना सुरुवात करावी. नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, जलसंपदा आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि नव्या कंत्राटदारांनी समन्वयाने योजनेचे काम युद्धस्तरावर पूर्ण करावे.
सन २०१६ मध्ये कामाचे कार्यादेश देण्यात आले होते. जुन्या कंत्राटदाराला मुदतवाढही देण्यात आली होती. तरीही काम पूर्ण झाले नाही. या योजनेच्या प्रगतीविषयी यापूर्वी अनेक बैठकाही घेतल्या. आता या योजनेचे काम पूर्ण न झाल्यास राज्याच्या मुख्य सचिवांकडे बैठक घेतली जाईल तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी बैठकीत दिले.
या योजनेतील विविध कामांचा पालकमंत्र्यांनी बैठकीत आढावा घेतला. यात जॅकवेल, पंप हाऊस, वॅाटर ट्रीटमेंट प्लांट, रेल्वे क्रॅासिंग, पाणी पुरवठा पाईपलाईन, विद्युतिकरण, रिव्हर क्रॅासिंग, रस्ते आदी कामांचा आढावा घेत या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. राठोड यांनी संबंधितांना दिले.
पालकमंत्र्यांच्या या बैठकीमुळे प्रलंबित असलेल्या दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती मिळणार आहे. या योजनेंतर्गत बहुतांश कामे पूर्णत्वास आली आहेत. मात्र कामातील दिरंगाईमुळे योजनेचे काम रखडले होते. त्यामुळे जुन्या कंत्राटदाराचे कंत्राट थांबवून गुजरातच्या श्री. एंटरप्रायजेस कंपनी या नव्या कंत्राटदाराला निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश देण्यात आले आहे. लवकरच योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दारव्हा शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
दारव्हा शहर पाणी पुरवठा योजनेचे कंत्राट दिलेल्या जुन्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामांची निविदा प्रक्रिया राबवून नवीन कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले आहे. लवकरच काम सुरु होईल. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत योजनेचे सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन केल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी बैठकीत दिली.
००००