बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

बोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक 17 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात येत्या २४ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून मान्यवर व उपासक येणार आहेत. त्यादृष्टीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय यंत्रणेसह नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर बोधीवृक्षाच्या फांदीरोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी भुजबळ फार्म कार्यालय, नाशिक येथे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत थेरो, भदत्न संघरत्न, समिती सदस्य आनंद सोनवणे, माजी नगरसेवक बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे आदि उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, शहरात हा मोठा महोत्सव विजयादशमीच्या दिवशी होत आहे. त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात 24 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या महोत्सवास श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रम्हदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम व कंबोडिया या देशातील अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि भन्ते व उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी बुद्धस्मारक परिसरात वाहन व्यवस्था, येणाऱ्या बौद्ध उपासकांची निवास, भोजन, सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी शासनाकडून 18 कोटी 4 लाख 67 हजारांचा निधी मंजूर झाला आहे. गुरु दलाई लामा यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. या निधीतून महोत्सवाच्या संपूर्ण भागाच्या सुशोभिकरणासाठी 8 कोटी 36 लाखांचा खर्च केला जाणार आहे. भिक्खु निवासस्थानाचा

आराखडा तयार करण्यात आला असून त्याच्या अनुषंगिक सुरक्षेसाठी साडेसात कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. तसेच बोधीवृक्षाचे रोपण झाल्यानंतर त्याच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहितीही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली. नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, बोधीवृक्ष महोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक येणार असून त्यादृष्टीने वाहतुक व्यवस्था नियोजनाचे कामही सुरू करण्यात आले आहे. सम्राट अशोक यांनी विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विजयादशमीच्या दिवशीच नागपूर येथे धम्मदिक्षा घेतली. शांततेचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

बोधीवृक्षाचे ऐतिहासिक महत्व असून सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना निरंजना नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यामुळे हे बोधीवृक्ष अतिपूजनीय आहे. पुढे सम्राट अशोक यांच्या मुलांनी या बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेच्या देवानामप्रिय तिरस यांच्या हस्ते अनुराधापूर येथे स्थापित केली. याच बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण नाशिक शहरात करण्यात येणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक महत्वात भर पडणार असल्याची माहिती शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत यांनी यावेळी दिली.

मंत्री छगन भुजबळ यांनी केली बोधीवृक्ष महोत्सव कार्यक्रम स्थळी पाहणी

यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्रिरश्मी बुद्ध लेणी बोधीवृक्ष स्थापनेचे नियोजित स्थळ व सभा ठिकाण यांची पाहणी केली. या ठिकाणी येणारे नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करावे. वाहतुक व्यवस्थेचे नियोजन करावे. कार्यक्रमात कुठलीही अडचण येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेस दिल्यात. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, शहर अभियंता एस.आर.वंजारी, आनंद सोनवणे, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भदत्न सुगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here