मुंबई, दि. १७ : – तळेगाव-दाभाडे (जि. पुणे) येथील जनरल मोटर्सच्या बंद झालेल्या प्रकल्पातील कामगारांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहील. तसेच हा प्रकल्प घेणाऱ्या ह्युंदाई कंपनीकडे रोजगार संधीसाठी पाठपुरावा केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
जनरल मोटर्सचा हा प्रकल्प ह्युंदाई कंपनीने खरेदी केला आहे. यातील कामगारांना जनरल मोटर्सने समाधानकारक भरपाई द्यावी तसेच काही कामगारांना ह्युंदाई कंपनीने सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार संजय तथा बाळा भेगडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद- सिंघल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा तसेच जनरल मोटर्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटनेचे पदाधिकारी, कामगार आदी उपस्थित होते.
जनरल मोटर्सच्या प्रकल्पातील १ हजार ५७८ कामगारांपैकी सुमारे ६९६ कामगारांनी भरपाईची रक्कम स्वीकारून स्वेच्छेने काम सोडल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित कामगारांची वाढीव भरपाई तर काहींची ह्युंदाईंने सेवेत घ्यावी अशी मागणी आहे. त्यावर उर्वरित कामगारांच्या वाढीव भरपाईच्या मागणीबाबत जनरल मोटर्सच्या व्यवस्थापनाने फेरविचार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
ह्युंदाईं हा प्रकल्प २०२५ मध्ये सुरू करणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन म्हणून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. हा प्रकल्प देखील मोठ्या रोजगार संधी उपलब्ध करून देणारा आहे. त्यामुळे भरपाई मान्य नसलेल्या आणि कुशल, अर्धकुशल अशा कामगारांना प्राधान्याने सेवेत घ्यावे यासाठी आवश्यक असा पाठपुरावा केला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
0000